मुकुंदवाडीतील ‘पार्सल डिलिव्हरी लिमिटेड’ या कुरिअर कार्यालयात प्रदीप पाटील या नावाने आलेले एक पार्सल महिनाभर उचलले गेले नव्हते. यामुळे संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. तपास पथकाने बॉक्स उघडून पाहिले असता 12 कार्टनमध्ये 672 नायलॉन मांजाचे गट्ट आढळले. या रॅकेटचा सूत्रधार म्हणून ओळखला गेलेला मुदशीर उर्फ मुजीब अहमद याला मंगळवारी अटक करण्यात आली होती. पुढील चौकशीत त्याचा भाऊ शेख फईम आणि त्यांचा साथीदार समीर अहमद यांनी सुरतहून हा माल मागविल्याचे स्पष्ट झाले. उपनिरीक्षक संदीप काळे आणि हवालदार संदीप तायडे यांनी ही कारवाई केली.
advertisement
बॅन असूनही 'ते' ऑनलाईन मागवले अन् फसले पोलिसांच्या जाळ्यात; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
नायलॉन मांजाची विक्री करून पैसा कमावणाऱ्या शेख फरदीन अब्दुल रजाक, तालेब खान शेरखान आणि मुदशीर या तिघांना पोलिसांनी त्यांच्या व्यावसायिक परिसरात राजाबाजारात धिंड काढत फिरवले. ज्याठिकाणी ते ‘हिना पतंग’ नावाच्या दुकानातून स्वतःला मोठे दुकानदार समजून फिरत होते, त्याच जागी त्यांना ‘मृत्यूचा व्यापारी’ म्हणून लोकांसमोर उभे राहावे लागले. अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या या धोकादायक मांजाची विक्री कशी जीवघेणी आहे, हे जनजागृतीसाठी पोलिसांनी सांगितले.
या टोळीने माल स्वतःकडे न ठेवता थेट कुरिअर ऑफिसमध्येच पडून दिला होता, जेणेकरून पोलिसांचे लक्ष त्यांच्याकडे वळणार नाही. माल मागवण्यासाठी जालना जिल्ह्यातील एका मजुराची कागदपत्रे वापरून बनावट सिमकार्ड घेतले होते. ती सिम फक्त व्यवहारासाठीच वापरली जात होती. हा संपूर्ण पुरवठा सुरतहून होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.






