पैठण शहरातील शहागड रोड परिसरात राहणाऱ्या 15 व 16 वर्षीय दोन सख्या बहिणी 9 जानेवारीच्या रात्री घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीय व नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत. अखेर पैठण पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत तातडीने विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे व पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सक्रिय झाले.
advertisement
पती-पत्नीत वाद, मुलगा शाळेत गेला, वडिलांचं धक्कादायक पाऊल, छ. संभाजीनगरात खळबळ
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने तात्काळ हरदा येथे जाऊन संबंधित मुलीला ताब्यात घेतले. चौकशीत दुसरी मुलगी खांडवा जिल्ह्यातील खालवा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने खालवा येथे जाऊन दुसऱ्या मुलीला देखील सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
पोलिस चौकशीत दोन्ही मुलींनी घरातील लग्नविषयक वादामुळे स्वतःहून घर सोडल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे पैठण येथे आणण्यात आले. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार त्यांना त्यांच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण कारवाईत पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे, अंमलदार विलास सुखदान तसेच महिला अंमलदार कोमल कोतकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सुरक्षित भविष्य देणारी मोहीम
“ऑपरेशन मुस्कान ही केवळ पोलिसी कारवाई नसून हरवलेल्या बालजीवनांना सुरक्षित भविष्य देणारी संवेदनशील मोहीम आहे. प्रत्येक हरवलेला मुलगा-मुलगी सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे आमचे सर्वोच्च ध्येय आहे,” असे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
... तर पोलिसांशी संपर्क साधा
“अल्पवयीन मुलींचा शोध घेणे ही मोठी जबाबदारी होती. पथकाने अहोरात्र मेहनत घेत सीमापार जाऊन मुलींची सुखरूप सुटका केली. नागरिकांनी अशा घटनांमध्ये वेळ न दवडता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी नमूद केले.






