छत्रपती संभाजीनगर : राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत 10 जानेवारी रोजी हवामान सौम्य, स्थिर आणि स्वच्छ राहील. पावसाचा कोणताही अंदाज नसल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत पोषक ठरेल. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणासाठी हवामानाचा योग्य उपयोग करून नियोजन करावे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात हवामान सौम्य आणि उबदार राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसा 28 ते 30 अंश सेल्सिअस तापमान तर रात्री 14 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. दिवसभर उन्हाचा तडाखा राहणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी योग्य पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
विदर्भात थंडीचा जोर कायम, अकोल्यातही पारा घसरला, तुमच्या जिल्ह्यात कशी असेल स्थिती?
बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ आणि स्थिर राहील. दिवसा 29 ते 31 अंश सेल्सिअस तापमान तर रात्री 15 ते 17 अंशांपर्यंत गारवा जाणवेल. विशेषतः लातूरमध्ये रात्री गारठा जाणवण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा पाऊस किंवा वादळी वारे होण्याची शक्यता नाही.
नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत हवामान उबदार व स्थिर राहील. दिवसा तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत राहील तर रात्री 16 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होईल. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पीक व्यवस्थापनासाठी पाण्याचा वापर संतुलित ठेवावा.
धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांत दिवसा हवामान उबदार आणि रात्री थोडकासा गारवा राहील. दिवसाचे तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल तर रात्री 15 ते 16 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान कमी होईल. रात्रीच्या गारठ्याचा विचार करून नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा.