अनेकदा हॉटेलकडून बिलात परस्पर 5 ते 10 टक्के सर्व्हिस चार्ज जोडला जातो. जर एखाद्या हॉटेलने हे शुल्क देण्याची सक्ती केली, तर ग्राहक प्रथम ते काढून टाकण्यास सांगू शकतात. तरीही दाद न मिळाल्यास, ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक 1995 वर कॉल करून किंवा ग्राहक अॅपद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सेवा शुल्काची सक्ती करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो.
advertisement
ग्राहक संरक्षण कायदा काय म्हणतो?
ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार, ग्राहकावर कोणत्याही सेवेसाठी सक्ती करणे हे अनुचित व्यापार पद्धती अंतर्गत येते. ग्राहकाच्या संमतीशिवाय त्याच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारणे हा कायद्याने गुन्हा आहे.
मार्गदर्शक तत्त्वात काय नमूद?
आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हॉटेलमध्ये प्रवेश करणे म्हणजे सेवा शुल्कास संमती देणे असा होत नाही. हॉटेलने आपल्या मेनू कार्ड किंवा परिसरात कुठेही सेवा शुल्क अनिवार्य असल्याचे फलक लावू नयेत. बिलात सर्विस चार्ज आकारण्यास बंदी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हॉटेल आणि रेस्टॉरंटना बिलात परस्पर सर्व्हिस चार्ज जोडण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. सेवा शुल्क हे जेवणाच्या बिलाचा भाग असू शकत नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
इतर नावाने किंवा छुप्या शुल्कावरही बंदी
कुठल्याही हॉटेलचा हॉटेलमालक सर्व्हिस चार्ज ऐवजी इतर कोणत्याही टोपणनावाने किंवा छुप्या पद्धतीने ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल करू शकत नाहीत. बिलामध्ये केवळ जेवणाचे दर आणि लागू असलेले सरकारी कर लावण्याचीच परवानगी आहे.
कुठे तक्रार कराल?
हेल्पलाइन : 1800-11-4000 किंवा 1915 या क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवू शकता, ग्राहक आयोग: जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करता येते, तसेच वेबसाइट www.consumerhelpline.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करता येते.
कारवाई आणि दंडाची काय तरतूद?
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कडक दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये हॉटेलचा परवाना रद्द होण्यापासून ते ग्राहकाला नुकसान भरपाई देण्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
ग्राहकांनी तक्रार करण्याआधी बिल, पावत्या जपून ठेवणे महत्त्वाचे
तक्रार दाखल करण्यासाठी हॉटेलने दिलेले मूळ बिल आणि त्यावर आकारलेला सर्व्हिस चार्ज हा सर्वांत महत्त्वाचा पुरावा असतो. त्यामुळे पेमेंट करण्यापूर्वी आणि केल्यानंतर बिलाचा फोटो किंवा प्रत पुराव्या दाखल जपून ठेवावी.





