धाराशिव : सकाळी सर्वात आधी चहा हवा, तरच पुढचं काम सुचतं असं अनेकजणांचं असतं. म्हणजेच बहुतेकजणांच्या दिवसाची सुरूवातच चहानं होते. त्यामुळे चहाचा व्यवसाय हा लहान असो किंवा मोठा असो, त्यातून नफा मात्र बक्कळ मिळतो. हाच विचार करून अनेकजण या व्यवसायात नशीब आजमवता. कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्की फायदा होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद हुंबे.
advertisement
दुष्काळामुळे घर सोडावं लागलं, परंतु शेवटी नाळ ही मातीशीच जोडलेली असते ते काही खोटं नाही. शिवाय आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती. मग पुन्हा आपल्या गावी येऊन नव्यानं त्यांनी घर मांडलं. चहा आणि हॉटेल व्यवसाय सुरू केला. आज महिनाकाठी त्यांची उलाढाल आहे सव्वा लाखांची.
हेही वाचा : शेतकऱ्यानं लढवली शक्कल, घेतलं 'या' भाज्यांचं उत्पादन; आज उलाढाल लाखोंची!
शरद हुंबे सांगतात, 'सततचा दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून घरदार सोडलं, चार पैसे मिळवण्यासाठी पुणे गाठलं. पुण्यात कंपनीत काम केलं आणि टाटा सुमो विकत घेतली. त्यात काही परवडलं नाही. अखेर 2011 मध्ये पुन्हा स्वतःचं गाव गाठलं. गावात आल्यावर पुन्हा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला.' मग त्यांनी थेट चहा विकायचं ठरवलं.
मित्राकडून 1 हजार रुपये घेऊन चहाचं हॉटेल त्यांनी सुरू केलं. टाटा सुमो विकून त्याच पैशात हॉटेलसाठी गाळा विकत घेतला आणि व्यवसाय अगदी जोमानं सुरू केला. आज दिवसाकाठी 3 ते 4 हजार रुपयांची कमाई होते. तर, एका महिन्यात 1 ते सव्वा लाख रुपये सहज मिळतात.
त्यांच्या हॉटेलमध्ये चहासोबतच अत्यंत उत्तम चवीची पुरी भाजी, मसाला राइस, मिसळपाव, पोहे आणि वडापाव मिळतो. हॉटेलसाठी लागणारं दूध घरीच उत्पादित केलं जातं. त्यांच्याकडे 5 ते 6 गायी आणि 10 ते 15 गुरं आहेत. गायींपासून दररोज 70 ते 80 लिटर दूध मिळतं. त्यामुळे चहासाठी दूध विकत आणावं लागत नाही. परिणामी त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं.