जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणारी ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे ही चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (१२ रोजी) सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी परतलीच नाही.
आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर मुलगी न आढळल्याने शाळेत चौकशी केली असता, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती शाळेत होती व नंतर घरी निघाल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता ती न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली; मात्र त्यानंतर तिचा काहीही मागोवा मिळालेला नाही.
advertisement
दरम्यान, गावाबाहेरील शेत रस्त्यावर धनश्रीचे दप्तर आढळून आले असून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव एलसीबीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी गावात ठाण मांडून असून आजूबाजूचा परिसर व शेतशिवार पिंजून काढत शोधमोहीम सुरू आहे. मात्र ५० तास उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
