जालना: मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र असलेला बकरी ईद हा सण आता काही दिवसांवर आला आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची परंपरा असते. या कुर्बानीसाठी चंद्रकोर असलेल्या बोकडांना राज्यभरात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे सामान्यपणे 15 ते 20 हजार रुपये किंमत येणाऱ्या बोकडाला कधी कधी दीड ते दोन लाख रुपये देखील मिळतात. ज्या बकरी पालकाकडे अशा प्रकारचे बोकड असतात, त्यांचे जणू भाग्यच उजळते. जालन्यातील धारकल्याणचे शेतकरी संतोष इंगोले हे आता एका बोकडापासून लखपती होणार आहेत.
advertisement
40 किलो वजन अन् 3 फूट उंची
जालना जिल्ह्यातील धारकल्याण गावचे संतोष इंगोले यांच्याकडे असलेल्या बकरीने 14 महिन्यांपूर्वी एका बोकडाला जन्म दिला. मागील बकरी ईद असताना हा बोकड केवळ दोन महिन्यांचा होता. तेव्हाच त्याच्या डोक्यावर असलेल्या चंद्रकोरीमुळे त्याला 30 हजार रुपये किंमत मिळत होती. मात्र बोकड लहान असल्याने इंगोले यांनी त्याची विक्री न करण्याचा निर्णय घेतला. आता हा बोकड 14 महिन्यांचा झाला असून त्याची 70 हजारापर्यंत बोली गेलीये. मुंबईतील तसेच राज्यातील इतरही शहरांमधून या बोकडाला मागणी होत असून दीड लाखापर्यंत किंमत येईल अशी अपेक्षा शेतकरी संतोष इंगोले यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुमचे जनावर गरोदर आहे की नाही? घरबसल्या काही सेकंदात मिळणार माहिती
कसा आहे बोकड?
या बोकडाचे वजन तब्बल 40 किलो असून उंची 3 फूट आहे. डोक्यावर चांदणीसह चंद्रकोर आहे. तो लहान असतानाच अनेकांना त्याला चांगली किंमत मिळेल असं सांगितलं होतं. पण तेव्हा लहान असल्याने विकलं नाही. सध्या हा बोकड मोठा झाला असून कधीकधी आवरणे कठीण होते. त्यामुळे आम्ही त्याला दोन दाव्यांनी बांधतो. आतापर्यंत 70 हजारांची बोली लागली आहे. मात्र, बोकडाला दीड लाखांपर्यंत किंमत आल्यास विक्री करणार असल्याचं इंगोले यांनी सांगितलं.





