थोरात विरुद्ध खताळ संघर्ष
ही गोष्ट लक्षात घेण्यासाठी आपल्याला इतिहासातील काही संदर्भ पाहावे लागतील. नगरच्या पट्ट्यात 1984 च्या सुमारास सहकार चळवळ रुजत होती. संगमनेर सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली होती. ही स्थापना करण्यात माजी मंत्री आणि सहकार नेते बी जी खताळ पाटील यांनी सर्वात मोठं योगदान दिले. खताळ पाटील हे शेतकऱ्यांपर्यंत पोहचले. त्यांना सदस्य केलं...शेअर गोळा केले...आणि हा सहकारी साखर कारखाना सुरु झाला...पण, काहीच वर्षात बी जी खताळ यांचा कारखान्यावरील पगडा कमी होऊ लागला...नवं नेतृत्त्व उदयास येऊ लागलं...आणि ते नेतृत्त्व होतं स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांचं...सहाजिकच खताळ विरुद्ध थोरात हा संघर्ष सुरु झाला...आणि या संघर्षात खताळांच्या बाजूने उभे होते वसंत देशमुख...पण, काळानुसार खताळांचा प्रभाव कमी झाला..भाऊसाहेब थोरातांच्या हातात कारखान्याच्या सगळ्या दोऱ्या गेल्या.
advertisement
खताळ गटाचे वर्चस्व कमी...
वर्ष 1989 मध्ये साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु होती...स्टेजवर विरोधी आणि सत्ताधारी दोघेही होते. भाऊसाहेब थोरात विरुद्ध खताळ हा गट तिथे होताच आणि वसंत देशमुखही होते. (वसंत देशमुख हे काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे चर्चेत आले होते.) जानकी अण्णा काजळे हे अध्यक्ष होते...भाषणं सुरु झाली...एक एक करुन सगळ्यांची भाषण संपली..नंबर आला वसंत देशमुख यांचा...सवयीप्रमाणे देशमुखांची जीभ याही भाषणात घसरली...आणि त्यांनी थोरातांवर स्टेजवरच टीका सुरु केली...यानंतर थोरातांचे कार्यकर्ते भडकले...जानकी अण्णा काजळेंनी वसंत देशमुखांना स्टेजवरच मारहाण केली...कार्यकर्त्यांच्या तावडीतही देशमुख सापडले...पण एवढं होऊनही वसंत देशमुखांनी विरोध सोडला नाही.
विखेंसोबत थोरात विरोधकांची मोट
त्यानंतर जिल्ह्यात विखेचा उदय झाला...साहाजिकच थोरातांचे सगळे विरोधी विखेंकडे गेले...त्यात वसंत देशमुखही होते...देशमुखांनी आधी बाळासाहेब विखेंसाठी...नंतर राधाकृष्ण विखेंसाठी आणि आता सुजय विखेंसाठी काम केलं...थोरात विरोधी गटातील प्रमुख चेहरा हे देशमुख राहिले...पण, वाद सोबत घेऊनच ते फिरले.. त्यानंतर 2009 चं वर्ष... ठिकाण- संगमनेरचं स्वागत मंगल कार्यालय... साखर कारखान्याची वार्षिक सभा...अध्यक्ष होते बाळासाहेब थोरातांचे व्हाही असलेले डॉ. सुधीर तांबे...तिथंही वसंत देशमुख हजर होते..नियमाप्रमाणे माईक देशमुखांच्या हातात आला...आणि इथंही देशमुखांना भावनांना आवर घातला आला नाही...आणि त्यांनी तिथंही खताळ विरुद्ध थोरात संघर्ष उकरुन काढला...त्यानंतर पुन्हा मागचंच पुढं आलं...थोरातांचे कार्यकर्ते भडकले...आणि वसंत देशमुखांच्या अंगावर कपडेही ठेवले नाहीत...आणि आता 2024...सुजय विखेंची सभा...ठिकाण धांदळफळ...वसंत देशमुख यांचंच गाव...आपल्या गावातील नेता म्हणून या सभेचं अध्यक्षपदही वसंत देशमुख यांनाच देण्यात आलं...खरं म्हणजे बीजी खताळही याच गावचे...त्यामुळं माईक हातात येताच देशमुखांना जुने दिवस आठवले..आणि त्यांनी ३ दशकांपूर्वीचं वैर पुन्हा उकरुन काढलं...जयश्री देशमुख यांच्यावर टीका केली...या टीकेनंतर संगमनेर पेटलं...थोरात-विखे संघर्ष ऐन विधानसभा निवडणुकीआधी ज्वालामुखीत बदलला गेला.
सहकारातील संघर्ष निवडणुकीच्या रिंगणात आला. भाऊसाहेब थोरात विरुद्ध खताळ हा साखर कारखान्यातील संघर्ष आता थेट निवडणुकीत उतरला. अमोल खताळ यांच्या विजयाने आता संगमनेरमधील हा सहकार-राजकारणातील संघर्ष किती पेटतो, याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.