कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या चुरशीच्या सामन्यांमुळे भारतासह जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष पॅरिस ऑलिम्पिकडे लागलेले आहे. गोल्डन गर्ल विनेश फोगाटने देखील अप्रतिम कामगिरी करत अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली होती. तिने अंतिम सामन्यात सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळवल्यानंतर जल्लोष करण्याची तयारी देखील सर्व देशभरातील क्रीडा प्रेमींनी केली होती. मात्र, ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेल्या देशभरातील क्रीडाप्रेमींसाठी अचानक एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली. विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असून ती 50 किलो गटात बसत नाही. त्यामुळे अंतिम सामन्यातून तिला अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे सध्या अवघ्या देशभरातील कुस्तीपटूंसह क्रीडाप्रेमी मध्ये दुःखाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
advertisement
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाट अतुलनीय कामगिरी केली. 53 किलो वजनी गटात सुरुवातीला खेळणाऱ्या विनेशला 50 किलो गटामधून खेळावे लागले. तरीही आपले कमी केलेले वजन कायम राखत तिने 7 तासात 3 दिग्गज पैलवानांना पराजित केले होते. त्यामुळेच देशभरातील प्रत्येकाची तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. अंतिम सामन्यात गेल्यानंतर सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला होता. खरेतर सेमीफायनलनंतर वजन किंचीत वाढल्याचे कळताच विनेशने वजन कमी करण्यासाठी रात्रभर सायकलिंग, जॉगिंग करून मेहनत घेतली. मात्र, अंतिम सामन्यासाठी 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त वजन भरल्यामुळे विनेश अपात्र ठरल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या बातमीमुळे विनेशसह सर्वच भारतीय क्रीडा जगताचे ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचे स्वप्न भंग झाले आहे.
Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..
विनेशला अंतिम सामन्यात अपात्र ठरविण्यात आल्याचे कळताच कोल्हापुरातील प्रत्येक कुस्ती केंद्रांमध्ये देखील निराशेचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या चंबुखडी येथील राजर्षी शाहू कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या पैलवानांनी तसेच प्रशिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विनेश ही ज्या पद्धतीने खेळत होती. त्यामुळे तिच्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. सर्वांनाच सुवर्णपदक मिळणारच अशी आशा धरून होते. मात्र, आता जे घडले ते खरंच दुःखदायक आहे. त्यामुळे झालेल्या गोष्टीचा सरकारकडून देखील विचार करण्याची गरज आहे. तर विनेशला देखील यापुढेही कुस्ती क्षेत्रातून सर्व प्रकारचे प्रोत्साहन आणि सहाय्य दिले जाईल, असे मत कुमार महाराष्ट्र चॅम्पियन असलेल्या साहिल शेखने व्यक्त केले आहे.
तसेच जपानच्या कुस्तीपटूला हरवल्यानंतर दिनेशकडून सुवर्णपदक मिळणारच असेच आम्ही धरून होतो. त्यामुळे सर्व प्रकारची आनंद उत्सवाची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, सध्याची ही बातमी अतिशय दुःखद आहे. पण झालेल्या घटनेबाबत तर्क वितर्क लावण्यापेक्षा खेळाडू स्वतः जेव्हा याबाबत बोलेल तेव्हाच यावर कुणीही व्यक्त होणे योग्य ठरू शकते, असे एनआयएस कुस्ती कोच असणाऱ्या संदीप फाटक यांनी सांगितले आहे.
जालना शहरात आढळला बिबट्या?, CCTV मध्ये काय दिसलं, वनविभागाने केले हे महत्त्वाचं आवाहन
दरम्यान, देशवासीयांचे स्वप्न भंग झाले असले तरी या परिस्थितीत विनेश फोगाटला देखील मोठा धक्का बसला आहे. रात्रभर वजन कमी करण्याच्या प्रयत्नानंतर आणि त्यानंतर बसलेल्या तपात्रतेच्या घटनेमुळे विनेशची तब्येत बिघडली असून सध्या तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या परिस्थितीत तिला आपण सर्वांनी साथ देणे गरजेचे असल्याचे मत देखील उपस्थित पैलवानांनी व्यक्त केले आहे.