कोल्हापूर : कोल्हापूर हा एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुर्मिळ झाडे, वनस्पती पाहायला मिळतात. अशातच कोल्हापुरातील एका कॉलेजच्या संशोधकांना अभ्यासा दरम्यान विशाळगड परिसरामध्ये एका नवीन प्रजातीची वनस्पती आढळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडाच्या परीसरात ही नवी वनस्पती आढळल्याने तिला या संशोधकांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही बहाल केले आहे. या संदर्भातील शोधनिबंध देखील एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे.
advertisement
कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधील काही संशोधकांना विशाळगडावर एक वनस्पती आढळली होती. माहिती घेतल्यावर ही एक वेगळी प्रजाती असून तिचे नव्याने नामकरण गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी या नव्या प्रजातीला चक्क छ. शिवाजी महाराजांवरुन सेरोपेजिया शिवरायीना हे नाव देण्यात आले आहे.
छ. शिवाजी महाराजांच्या नावावरुन पहिल्यांदाच एका वनस्पतीच्या प्रजातीला नाव देऊन कोल्हापूरच्या संशोधकांनी शिवरायांप्रती अनोख्या पद्धतीने कृतज्ञता दर्शविली आहे. तर फायटोटॅक्सा या न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात देखील या संदर्भातील शोधनिबंध नुकताच प्रकाशित झाला आहे.
Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..
संशोधनाच्या या कार्यात कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागातील अक्षय जंगम, रतन मोरे, डॉ. निलेश पवार, नाशिकच्या चांदवड येथील डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील प्राध्यापक डॉ. एस. आर. यादव यांचा समावेश होता. गेल्या 6 वर्षांपासून अक्षय जंगम आणि डॉ. निलेश पवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यांवर आढळणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. याच संशोधनाच्या कामावेळी ऑगस्ट 2023 मध्ये ही कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती विशाळगडावर आढळली होती.
नवी प्रजाती सापडल्याची माहिती -
या संशोधन कार्यातील डॉ. शरद कांबळे हे भारतामधील कंदीलपुष्प वर्गाच्या तज्ञ असून मूळचे कोल्हापूरचे पण सध्या नाशिक येथे कार्यरत आहेत. त्यांनी पाहणीअंती ही एक नवीन प्रजाती असू शकते असे मत व्यक्त केले. पुढे शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव यांची याबाबत संशोधन केले. यादव यांनीच अख्ख्या भारतात सेरोपेजिया वर्गाला विशेष ओळख मिळवून दिली असून आत्तापर्यंत त्यांनी या वर्गातील एकूण 6 नवीन प्रजाती शोधल्या आहेत. शेवटी निरीक्षणाअंती ही वनस्पतीची एक नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते, हे स्पष्ट झाल्यानंतर यासंदर्भातील शोधनिबंध आतंरराष्ट्रीय नियतकालिकात पाठवण्यात आला.
का दिले शिवरायांवरुन नाव -
या नवीन प्रजातीच्या वनस्पतीला छ. शिवाजी महाराजांचे नाव देण्याचे कारण म्हणजे शिवरायांप्रती असणारा आदर होय. महाराजांनी सह्याद्रीच्या आश्रयछायेत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून याच ठिकाणी स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक गडकील्ल्यांची निर्मिती केली. त्यासोबतच सभोवतालच्या जंगलांचे महत्व जाणून एकूणच गडकिल्ल्यांच्या माध्यमातून वनस्पतींसाठी जणूकाही जंगलाची संरक्षित क्षेत्रेच राखीव केली. म्हणूनच शिवरायांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली, असे भाग्योद्गार संशोधकांनी काढले आहेत.
शोधण्यात आलेल्या या नवीन प्रजातीच्या अधिवास गडावर मर्यादित प्रमाणात असला तरी आजूबाजूच्या डोंगर रांगांमध्ये देखील ही प्रजाती आढळू शकते, अशी शक्यता या संशोधकांनी व्यक्त केली आहे. तर या संशोधनाच्या कामासाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील आणि संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. दरम्यान, शिवरायांवरून देण्यात आलेल्या या वनस्पतीच्या नावामुळे कोल्हापुरातील विशाळगडाचे नाव आता पुन्हा एकदा जगप्रसिद्ध झाले आहे.