कोल्हापूर : कोल्हापुरात अनेकानेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. त्यामध्ये शहराच्या मध्यवस्तीत वसलेले एक विठ्ठल मंदिरदेखील तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिर समूह नावाने प्रचलित असलेले या परिसरात प्रवासी विठ्ठलाचे हे मंदिर आहे. संपूर्ण मंदिराबरोबरच गाभाऱ्यात असणारी मूर्ती देखील तितकीच सुंदर आहे. एकादशीच्या निमित्ताने त्या मंदिरात अनेक कार्यक्रम होत असतात.
कोल्हापुरातील ही विठ्ठल मूर्ती, प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातील नंदवाळ या ठिकाणच्या मंदिरातील विठ्ठल मूर्ती आणि पंढरपूर येथील विठ्ठल मुर्तीशी निगडित एक कथादेखील कोल्हापूरचे ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या 'करवीर महात्मे' या ग्रंथात पाहायला मिळते.
advertisement
मिरजकर तिकटी या कोल्हापूरच्या महत्त्वाच्या ठिकाणी हा मंदिर समूह परिसर आहे. हे मंदिर कधी बांधले याचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात पाहायला मिळत नसला, तरी आजूबाजूच्या प्राचीन मंदिरांवरून साधारणपणे अकराव्या आणि बाराव्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली असावी, असा अंदाज मंदिर आणि मूर्ती अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी व्यक्त केला आहे.
दुष्काळी स्थितीमुळे मेंढपाळांच्या जीवनात भटकंती, पोटाची खळगी भरण्यासाठीची ही संघर्षमय कहाणी!
कसे आहे हे मंदिर?
या मंदिराच्या पुढच्या लाकडी मंडपाची उभारणी ही संस्थानिक काळामध्ये करण्यात आली आहे. मंदिरात दगडी सोळखांबी स्तंभ आणि चौखांबी रचनेमध्ये विठ्ठल, राही आणि रुक्मिणी अशा 3 मूर्ती गाभाऱ्यात प्रतिष्ठित असेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मूर्तीच्या एका हातामध्ये पद्म आणि एकामध्ये शंख अशा प्रकारची कमरेवर ठेवलेल्या दोन हातांची रचना आहे. हातामध्ये पद्म असलेला उजवा हात साधारणपणे वरद मुद्रा असल्याप्रमाणे कमरेवर ठेवलेला आहे. डाव्या हाताने शंख पकडले आहे.
या मूर्तीच्या पायामध्येही सुंदर असे अलंकार आहेत. तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मूर्तीच्या मस्तकावर एक शिवलिंग आहे. कानामध्ये मकर कुंडल अशा समस्त अलंकारासह अलंकृत अशी ही विठ्ठलाची मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. तर तिच्या उजव्या हातामध्ये कमळकळी आणि डावा हात कमरेवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राहीची देखील मूर्ती ही दोन्ही हात कमरेवर ठेवलेल्या मुद्रेमध्ये विराजमान असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
वारीच्या वाटेत रमला अन् सोडली दारू, पांडरंगाच्या भक्तीत लीन झालेल्या व्यक्तीची प्रेरणादायी गोष्ट!
पंढरपूर प्रमाणेच कान्होपात्रा, गोपाळकृष्ण अगदी नामदेवांची स्मृती जपणाऱ्या पादुका अशी अनेक चिन्हे या मंदिर परिसरात आहेत. तर मंदिराच्या प्रांगणामध्ये आई वडिलांची सेवा करण्यासाठी विठ्ठल, समोर गरुड, हनुमंत आणि महादेव यांच्या समस्त परिवार देवता यांच्यामुळे पंढरपुरच्या मंदिराची अनुभूती या विठ्ठल मंदिरात आल्यावर होते, असेही मालेकर सांगतात.
का नाव पडले प्रवासी विठ्ठल -
या विठ्ठल मुर्तीच्या पायामध्ये एक सुंदर अलंकारदेखील पाहायला मिळतो. काही जणांच्या मते पायामधील हा अलंकार पादुकांप्रमाणे भासतो, म्हणून याला बरेच जण प्रवासी विठ्ठल म्हणतात. पण वास्तविक प्राचीन काळातल्या अलंकार शास्त्राप्रमाणे देवाच्या पायामध्ये पादुका नसून सुंदर असा हा सोन्यासारखा अलंकार आपल्याला पाहायला मिळतो, असेही ॲड. मालेकर यांनी स्पष्ट केले आहे.
अशा या सशक्ती असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठल मंदिरात दर्शनाला अनेक भाविक येत असतात. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त विविध पूजाविधी कार्यक्रम देखील मंदिरात आयोजित केले जातात. त्यानिमित्ताने एकदा या मंदिराला भेट द्यायला हवी.





