मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आझाद मैदानात मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा आंदोलनकर्त्यांकडून काल रात्री आझाद मैदानात आंदोलन सुरू ठेवण्यासाठी पोलीस परवानगीसाठी अर्ज केला होता. आज सकाळी मुंबई पोलिसांनी हा अर्ज फेटाळला आणि परवानगी नाकारली आहे. तर, दुपारी हायकोर्टात झालेल्या सुनावणीत खंडपीठाने मुंबई रिकामी करण्याचे आदेश सरकारला दिले. आंदोलकांना आणि त्यांच्या वाहनांना रस्त्यावरून हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून आंदोलकांची मनधरणी करण्यात येत असून वाहने हटवण्याची सूचना केली जात आहे.
advertisement
शासकीय पातळीवर हालचाली...
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू असताना आज सकाळी पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पाडली. या बैठकीत जरांगे यांच्या मागणीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर जरांगेंच्या मागणीच्या अनुषंगाने शासकीय आदेशाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा आता जरांगेंसोबत चर्चा करून अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच सरकारचे शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल होणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आझाद मैदानात दाखल होणार आहेत.
हायकोर्टाचा अल्टिमेटम...
आजच्या सुनावणीत खंडपीठाने म्हटले की, फक्त ५ हजार लोकांना आझाद मैदानावर परवानगी ..मग उर्वरित लोकांना तुम्ही सुचीत करायला हवं . ५० हजार ते १ लाख लोक मुंबईतील रस्त्यांवर आले आहेत.. प्रसार माध्यमांच्या मदतीने ज्यादा लोकांनी परत जावे असे आम्ही सुचीत केले. वाहनांची वाहन मालकांची माहीत तुम्हाला द्यावी लागेल असे म्हटले. त्यावर ॲड सतीश मानेशिंदे यांनी म्हटले की, काही लोकांकडून त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो, असे सांगितले. हायकोर्टाने आझाद मैदान रिकामं करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आता पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये संघर्ष होण्याची भीती आहे.