मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या निर्णायक आंदोलनाचा टप्पा आता सुरू झाला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठ्यांचं वादळ आता मुंबईत दाखल झालं आहे. आझाद मैदानात पोहचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागणीसाठी शड्डू ठोकला आहे.
advertisement
आपलं आमरण उपोषण सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालं आहे. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलोय हे विसरू नका. एकजुटीनं आपल्याला पुढं जायचं असल्याचे त्यांनी सांगितले. आता आपल्या मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा एल्गार जरांगे यांनी केला. सरकार आडमुठेपणाने वागलं तर आपण पाहून घेऊत, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
जरांगे पाटील यांनी म्हटले की, आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आज आपण आझाद मैदानावर आलो आहे आणि आमरण उपोषण सुरू केलं. आता तुमची काय जबाबदारी? हे महत्त्वाचं आहे ऐकून घ्या समजून घ्या, असे जरांगे यांनी सांगितले.
सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं, म्हणून आपण ठरवलं होतं की घराघरातून निघायचं आणि मुंबईला जायचं मुंबई जाम करायची. आता गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं. म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम करणार होतं आणि मुंबई जाम केलं पण आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्या बद्दल सरकारचं कौतुक केलं आहे. सरकारने सहकार्य केलं आता तुम्हीही सहकार्य करायचं असे जरांगे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीस यांना चांगली संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगली संधी आहे. मराठ्यांची नाराजी ओढावून घेऊ नका. सरकारने आडकाठी न आणता उपोषण सुरू करू द्याव. आम्ही फक्त आरक्षण घ्यायला आला आहोत. मी मुंबईत आरक्षणासाठी आला आहोत असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मराठ्यांच्या अंगावर, डोक्यावर विजयाचा गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मला तुरुंगात नेऊन टाकलं, तरी चालेल. तिथं सडलो, तरी चालले. पण मागं हाटणार नाही," असा थेट मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.