आम्ही काढलेला मोर्चा मराठी माणूस, मराठी भाषेच्या विरोधात नव्हता, ज्यांनी मारहाण केली त्या व्यक्तीच्या विरोधात असल्याचे पत्रात म्हटले आहे. कोणाच्या भावना दुखावले असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं लेखी निवेदन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना व्यापारी संघाकडून देण्यात आले.
advertisement
मने दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अमराठी व्यापाऱ्यांची भूमिका
मारहाणीविरोधात तीन तारखेला आमचा मोर्चा निघाला होता. मराठी बांधवांचे मन दुखविण्याचे आमचे कोणतेही प्रयोजन नव्हते. मात्र राजकीयदृष्ट्या चुकीचा संदेश मोर्चामधून संपूर्ण महाराष्ट्रभर गेला. आजपर्यंत मराठी बांधवांसोबत आम्ही अतिशय गुण्यागोविंदाने राहतो. आमच्यात कधीच भांडणे झाली नाहीत. एका व्यापाऱ्यासोबत मारहाणीची घटना झाल्यानंतर समाज म्हणून एक प्रतिक्रिया आली. पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर आता आमची कोणत्याही पक्षाविरोधात काही तक्रार नाही. मोर्चा काढण्याचा काहीही हेतू नव्हता. केवळ गुन्हेगारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही मोर्चातून केली. परंतु तरीही कुणाची मने दुखावली असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे अमराठी व्यापाऱ्यांनी सांगितले.
मोर्चा काढला तर कारवाई नक्की, पोलिसांची तंबी
अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात तसेच मराठी माणसांची ताकद दाखविण्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या मोर्चाला मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मोर्चा काढला तर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी पोलिसांनी दिली आहे. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांनाही पोलिसांनी इशारा दिलाय.