वर्धा : मे महिना हा प्रचंड उष्णतेचा असतो. परंतु यंदा मात्र मार्च महिन्यापासून न सोसणाऱ्या उकाड्याला सामोरं जावं लागलं. मध्यंतरी राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. तेव्हा कुठे गारवा जाणवला, परंतु पुन्हा तापमान जैसे थे झालं. शिवाय अवकाळीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालं ते वेगळंच. आता एप्रिल महिनाखेर तापमान आणखी वाढण्याचा अंदाज देण्यात आलाय. तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाचीही शक्यता आहे.
advertisement
मुंबईत 26 एप्रिलला 26 अंश डिग्री सेल्सियस एवढ्या किमान आणि 36 अंश डिग्री सेल्सियस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर, 27 एप्रिलला 37 अंश डिग्री सेल्सियस एवढं शहराचं तापमान असेल. 28-29 तारखेला तर मुंबईचा पारा 39 अंश डिग्री सेल्सियसवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतील हे नक्की.
हेही वाचा : टरबूज की खरबूज? दोन्ही पाणीदार, पण उन्हाळ्यात आरोग्यासाठी सर्वोत्तम काय?
पुण्याच्या तापमानात काही फारसा बदल होणार नाहीये. 26 एप्रिलला इथं 23 अंश डिग्री सेल्सियस किमान आणि 39 अंश डिग्री सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. 27 एप्रिलला यात एका अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना तब्बल 40 अंश डिग्री सेल्सियसच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. तसंच इथं आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातही उष्णता कायम असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 एप्रिलला 39 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आता इथं अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. त्यामुळे 27 एप्रिलला इथलं वातावरण अंशत: ढगाळ असेल, परंतु उन्हाचा पारा मात्र 40 अंश डिग्री सेल्सियसवर पोहोचेल. त्यापुढे हे तापमान आणखी वाढत जाणार असून 2 मेपर्यंत 42 अंश डिग्री सेल्सियसवर पोहोचण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : 2 मिनिटांत बनवा खास रेसिपी, आंबा पुदिना चटणी कधी खाल्लीये का? Video
पश्चिम महाराष्ट्रातही ऊन कायम आहे. कोल्हापूरच्या तापमानात 2 अंशांची वाढ झालीये. 26 एप्रिलला इथं 38 अंश डिग्री सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं, तर 27 एप्रिलला ते 39 अंश डिग्री सेल्सियस एवढं असण्याची शक्यता आहे. तर, 28-29 एप्रिलला इथं अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. विदर्भाच्या हवामानाची स्थिती उन्हाच्या बाबतीत काही वेगळी नाही. नागपूरमध्ये 26 एप्रिलला किमान 26 आणि कमाल 40 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 27 एप्रिलला यात आणखी एका अंशाची वाढ होईल. इथलं तापमान 41 अंश डिग्री सेल्सियस एवढं असेल. तसंच इथं पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर, 28 एप्रिलपासून पुढील काही दिवस इथलं तापमान 42 अंशांवर जाईल.
नाशिकमध्ये 26 एप्रिलला किमान 26 आणि कमाल 41 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 27 एप्रिललासुद्धा नाशिककरांना एवढ्याच प्रखर उन्हाचा सामना करावा लागणार आहे. तसंच सायंकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. एकंदरीत, राज्यात काही भागांमध्ये 27 एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसा प्रखर ऊन आणि रात्री गारवा अशा स्थितीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. शिवाय शेतकऱ्यांनी पिकांचंही संरक्षण करावं.