नागपूर: कासव हा उभयचर प्राणी असून तो पाण्यात आणि जमिनीवर राहतो. पाण्यातील लहान मासे किंवा शेवाळ असं त्याचं खाद्य असतं. पण एखादं कासव थेट मांसाहारच करतंय असं कुणी म्हटलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. पण नागपुरात असं एक कासव असून ते फक्त चिकन खातंय. नाईक तलावाची सफाई करताना हे 70 ते 80 वर्षांचं कासव आढळलं. त्याचं वजन 80 किलो असून सध्या ते सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे ठेवण्यात आलंय.
advertisement
नागपुरातील नाईक तलावाची साफसफाई करण्याचं काम गतवर्षी मे महिन्यात सुरू होतं. तलावातील गाळ काढताना त्या ठिकाणी एक भलं मोठं कासव आढळलं. जखमी अवस्थेत असल्याने त्याला पकडून सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे पाठवण्यात आलं. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला खाण्यासाठी लहान मासे आणि शेवाळ देण्यात आले. परंतु, त्यानं ते खाल्लं नाही. मग अधिकाऱ्यांनी त्याला चिकन खायला दिले. तर या कासवाने ते लगेच खाल्ल्याचं वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी सांगितलं.
साडी चोळीची ओटी अन् पैठणीचा मान, साताऱ्यात पार पडलं चक्क गाईचं डोहाळे जेवण
कशी लागली चिकन खाण्याची सवय?
कासव हे पाण्यातील लहान मासे, शेवाळ वगैरे वनस्पतींवर जगत असते. परंतु, या कासवाला चिकन खाण्याची सवय लागली. याचंही एक कारण आहे. नागपूरमधील नाईक तलाव परिसरात मटन आणि चिकन विक्रेते खराब मांस आणून टाकतात. पाण्यात आणि पाण्याच्या कडेला पडलेलं हेच मांस खाण्याची सवय या कासवाला लागली. त्यामुळे त्याचे वजनही 80 किलोपर्यंत वाढल्याचे हाते यांनी सांगितलं.
चक्क सापानेच बदलला रंग, नागपुरात दिसला पांढरा तस्कर, संशोधकांनी सांगितलं कारण
कसं ठरवलं कासवाचं वय?
नाईक तलावात साफसफाई करताना पाणी कमी झालं. त्यानंतर हे कासव पृष्ठभागावर आलं आणि वनविभागाने त्याची सुटका केली. उपचारासाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर येथे त्याला आणण्यात आलं. हे कासव भारतीय सॉफ्टशेल प्रजातीचे आहे. हे गोड्या पाण्यातील कासव असून त्याचं आयुष्य 150 वर्षांपर्यंत असतं. या प्रजातीचे कासव गंगा आणि गोदावरी नद्यांमध्ये आढळतात. ते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार खाऊ शकतं. पण तलावातील मांसामुळं ते मांसाहारी झालं. कासवाचं वजन आणि सॉफ्टशेलच्या आकारावरून वयाबाबत अंदाज लावला जातो. त्यानुसार ते 70 ते 80 वर्षे वयाचं असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी राजेश फुलसुंगे सांगतात.