राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई आणि पुण्यासहसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली . १५ नोव्हेंबरला मतदान पार पडेल तर १६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळातच बंडू आंदेकरच्या घरात रोकड असल्याचा सुगावा पोलिसांना लागल्यावर त्यांनी सोमवारी सायंकाळी छापेमारी केली.
२२ लाखांची रोकड जप्त, बंदुकही सापडली
advertisement
बंडू आंदेकरच्या घरावरील छापेमारीत पुणे पोलिसांना तीन पिस्तूल तसेच वीस ते बावीस लाख रुपयांची रोकड सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे पोलीस मागील तासभरापासून बंडू आंदेकरच्या घराची झाडाझडती घेत आहेत. सायलेन्सर असलेली बंदूकही पुणे पोलिसांनी जप्त केल्याचे कळते आहे.
तुरूंगात असतानाही आंदेकरांकडून निवडणुकीची तयारी
पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यास आंदेकर इच्छुक होता. आंदेकर कुटुंबातील सदस्य तुरूंगात असतानाही त्यांच्याकडून निवडणुकीची तयारी सुरू होती. त्यासाठी रोकड आणि इतर स्त्रोतांची जमवा जमव सुरू होती. याच बाबींची कुणकुण पोलिसांना लागल्यावर त्यांनी छापा टाकला.
आंदेकर कुटुंबाचा राजकीय दबदबा
पुण्याच्या राजकीय पटलावर आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व राहिले आहे. आंदेकर कुटुंबातील सदस्य वत्सला आंदेकर या काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. १९९८-९९ मध्ये त्यांनी पुणे शहराचे महापौरपद भूषवले. पुण्याचे तत्कालिन कारभारी सुरेश कलमाडी यांच्यावर दबाव आणून त्यांनी महापौरपद मिळविल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. वत्सला आंदेकर यांचे पुतणे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. वनराज आंदेकर यांची सप्टेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर, आणि इतर सदस्यही नगरसेवक राहिले आहेत.
