स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्याप कोणतीही मदत किंवा उपाय योजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरामध्ये दरवर्षी अशीच परिस्थिती उद्भवते. प्रशासनाकडून कोणतीही कायमस्वरूपी सोय केली जात नाही. सध्याच्या कठीण प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळवी आणि त्यांचा स्वयंसेवक गट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ते बोटीद्वारे लहान मुलांना, महिलांना, वृद्धांना आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहेत.
advertisement
सुरेश साळवी म्हणाले, "मी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात येतो. याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात कमरेपर्यंत पाणी भरते. स्थानिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. मी आणि माझे सहकारी मदत करण्याचा प्रयत्न करतो."
तलावाजवळील परिसरात गणेश मूर्तींचा एक मोठा कारखाना आहे. हा कारखाना देखील पाण्याखाली गेल्याने गणपती बाप्पाच्या अनेक मूर्तींचं नुकसान झालं आहे. पाण्यामुळे मूर्ती भिजून खराब झाल्या असून, कारागिरांचं आर्थिक नुकसान झालं आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना झालेलं नुकसान हे मूर्तिकारांसाठी मोठा धक्का आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे की, त्वरीत मदत पाठवावी, पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि दरवर्षी होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल, अशी ताकीद देखील स्थानिकांनी दिली आहे. सध्या परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.





