विष्णू मारूतीराव कांबळे यांच्या 82 लाखांच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधककडून सांगलीच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी पदावर असताना विष्णू कांबळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बेहिशेबी मालमत्ताची तपासणी केली. त्यामध्ये कांबळे दाम्पत्याच्या नावे 82 लाख 99 हजार 952 रूपयांची बेहिशेबी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 16 जून 1986 ते 6 मे 2022 या कालावधीत कांबळे यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाने जमवलेल्या तसेच कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा बेहिशेबी मालमत्तेचे परीक्षण केले. त्यामध्ये त्यांनी 82 लाख 99 हजार 952 रूपयांची बेहिशेबी माया जमवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी कांबळे दाम्पत्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विष्णू कांबळे (वय 59), त्यांची पत्नी जयश्री विष्णू कांबळे (दोघेही रा बारबोले प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार अधिनियम 1988 चे कलम 13(1) (ई), 13 (2), सहकलम भारतीय दंड संहिता कलम 109 तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिय सन 2018 चे कलम 13(1) (ब), 13(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.