मिरज तालुक्यातील सोनी गावातील प्रकाश गाढवे या पशुपालकाच्या मुलीने दोन्ही कानातील दागिने काढून एका वाटीमध्ये ठेवले होते. दागिने खरकट्या पाण्यासोबत शेळ्यांच्या पुढे गेले. हे खरकटे पाणी त्यांच्या दोन्ही शेळ्यांनी पिले आणि पाण्यासोबत दागिनेही गिळले. कर्णवेल गायब झाल्याचे लक्षात येताच शेळ्यांनी पाण्यासोबत गिळले असल्याचा अंदाज त्यांना आला.
advertisement
गाडवे यांनी मिरजेच्या शासकीय पशू रुर्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ढोके यांच्याशी संपर्क साधला. यानंतर गाढवे यांच्या पाच वर्षे वयाच्या दोन्ही शेळ्यांच्या पोटाचे एक्स-रे काढण्यात आले. रिपोर्टमध्ये काहीतरी धातू असल्याचे निदर्शनास येताच दोन्ही शेळ्यांची शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. यानंतर शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करून प्रत्येकी दोन दोन ग्रॅमचे 40,000 किमतीचे कर्णवेल बाहेर काढले.
दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम
डॉ. विजय ढोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळ्या, गाय, म्हैस, बैल हे प्राणी काही खाल्ल्यानंतर रवंथ करतात. त्यांच्या पोटाची रचना चार कप्याची असते. या प्राण्यांनी सुई, तार, खिळा, मोळा गिळल्यास त्यांच्या हृदयाला इजा होण्याचा धोका असल्याने अशा वस्तू तातडीने बाहेर काढाव्या लागतात. मात्र दागिने किंवा अन्य न टोचणाऱ्या वस्तू त्या पोटात राहिल्यास प्राण्याला काही त्रास होत नाही. मात्र शेळ्यांनी किमती कर्णवेल गिळल्याने त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. दोन्ही शेळ्यांची प्रकृती उत्तम असल्याचेही डाॅ.ढोके यांनी सांगितले.
1140 रुपये खर्चात चाळीस हजाराचे दागिने मिळाले परत पशुपालक गाढवे यांच्या दोन शेळ्यांच्या रुमीनाटॉमी शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी 70-70 रुपये फी आणि औषधांसाठी हजार रुपये असा 1140 रुपये खर्च गाढवे यांना करावा लागला. मात्र, 4 गॅम वजनाचे 40 हजार रुपये किंमतीचे दागिने परत मिळाले. या अजब घटनेनंतर पशुपालकांनी योग्य ती दक्षता घेऊन कष्टाने कमावलेल्या दागिन्यांची आणि पशुधनाची योग्य ती खबरदरी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





