सातारा : साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथं अनेक ऐतिहासिक वस्तूंचा खजिना पाहायला मिळतो. प्राचीन मंदिरं, शिलालेख, समाध्या, मूर्ती, इत्यादी अनेक ऐतिहासिक वास्तूही पाहायला मिळतात. इथल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवकालीन आणि शिवपूर्वकालीन तसंच पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन शस्त्र संग्रहित केलेले आहेत. तब्बल 140 शस्त्रांनी हे संग्रहालय संपन्न आहे. हे शस्त्र नेमके आणले कुठून याबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
advertisement
जयसिंगपूर येथील दिवंगत शस्त्रसंग्रहक गिरीश जाधव यांनी आयुष्यभर संपूर्ण महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यांतून फिरून, स्वतःच्या खिशातून पदरमोड करत शिवकालीन अनेक शस्त्रांचा अनमोल साठा जतन केला. हा साठा जतन करत असताना स्वर्गीय गिरीश जाधव हे अनेकदा घरापासून दूर राहून आपला छंद जोपासत होते. त्यांनी साठवलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्रांपैकी काही तलवारी, कट्यारी, ढाली, दांडपट्टे, कुऱ्हाडी, भाले अशा एकूण 140 शस्त्रांचा खजिना श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे कोल्हापूर येथे सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे सातारच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये आणखी शिवकालीन शस्त्र आणि अस्त्रांची मोलाची भर पडली आहे.
हेही वाचा : लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिनं हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग, सोलापूरकर लय भारी!
मूळ जयसिंगपूर येथे राहणारे स्वर्गीय गिरीश जाधव हे केमिकल इंजिनियर म्हणून मुंबईत कार्यरत होते. तरुण वयापासून त्यांनी शिवकालीन शस्त्रांचा साठा करण्याचा छंद जोपासला होता. त्यांच्या संग्रहात असंख्य दुर्मीळ वस्तूंचा खजिना होता, काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी हा शस्त्रसाठा कोल्हापूर येथील वस्तूसंग्रहालयात सुपूर्द केला.
दरम्यान, सातारच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नव्या वास्तूचं बांधकाम करण्यात आलंय. सध्या या इमारतीत वेगवेगळ्या दालनाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. आता इथल्या खजिन्यात 140 शस्त्रांची भर पडलीये. संग्रहालयात येणाऱ्या सर्व पर्यटकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला या ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.





