सोलापूर : आषाढी वारीसाठी वारकरी, भाविक आणि प्रशासन सज्ज झालं आहे. वारीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ठिकठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. एकीकडे देहूत 28 जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानाची जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे 29 जून रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं अत्यंत प्रसन्न वातावरणात प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 6 ते 11 जुलैदरम्यान साताऱ्यातून जाईल. या कालावधीत वारकरी आणि भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची जबाबदारी सातारा जिल्हा परिषदेकडून घेण्यात येणार आहे.
advertisement
वारीत सर्व वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेनं चालतात. सध्या वातारणात झपाट्यानं बदल होताहेत. कधी उन्हात पाऊस, तर कधी पावसात ऊन, अशी स्थिती आहे. अशा या वातावरणात साथीचे आजार झपाट्यानं पसरतात. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. वारकऱ्यांना वारीदरम्यान आरोग्याबाबत कोणताही त्रास होऊ नये यासाठी सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज झालाय. जिल्ह्यातून पाडेगाव, तालुका खंडाळा ते फलटण या मार्गावरून पालखी जाणार आहे. त्यामुळे या महामार्गावर आरोग्य विभागाकडून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
नेमकी व्यवस्था काय?
शासकीय वैद्यकीय संस्था 12, खासगी वैद्यकीय संस्था 120, अशा मिळून जिल्ह्यात वैद्यकीय संस्थांची संख्या आहे 132. तसंच सातारा जिल्हा प्रशासनानं शासकीय आणि खासगी मिळून 1040 खाटांची सुविधा वारकऱ्यांसाठी केली आहे. तसंच खंडाळा 5 आणि फलटण 2 असे 7 स्थिर वैद्यकीय पथक आहेत. त्याचबरोबर 14 तात्पुरत्या स्तरावर 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' स्थापन करण्यात येणार आहेत. लोणंद, तरडगाव, बरड आणि फलटण उपजिल्हा रुग्णालय असे 4 ठिकाणी ICU असणार आहेत. तसंच 5 ICU सेंटर उभारण्यात येतील. त्यात फिजिशियन्स आणि स्त्रीरोगतज्ज्ञांसह मॉनिटर, व्हेंटिलेटर उपलब्ध असेल.
हेही वाचा : बोला पुंडलिक वरदे...! पालखी निघणार, सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं सातारा जिल्ह्यात शनिवारी, 6 जुलै रोजी आगमन होईल. सोहळ्याचा पहिला आणि दुसऱ्या मुक्काम लोणंद इथं असेल. त्यानंतर तरडगाव फलटण आणि बरड इथं पालखी सोहळा मुक्कामी असेल. या कालावधीत वारकरी आणि भाविकांना सर्व वैद्यकीय सोयीसुविधा मिळाव्या यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.
पाडेगाव ते बरड महामार्गावर प्रत्येकी 4 किलोमीटर अंतरावर पुरेशा औषध साठ्यासह 1 रुग्णवाहिका, 1 वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेविका वारकऱ्यांच्या सेवेत असणार आहेत. पालखी महामार्गावर आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी दिली.