सातारा : राज्याच्या विविध भागांमध्ये काही दिवसांपासून धो धो पाऊस कोसळतोय. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झालाय. इथला सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा लिंगमळा धबधबा ओसंडून वाहतोय.
यंदा पावसाच्या पहिल्याच सत्रात या धबधब्याला तुफान पाणी आलं असून लाल माती मिश्रित लोट कड्यांवरून धबधब्याच्या पाण्यातून वाहू लागले आहेत. वनविभागाकडून पर्यटकांना इथं जाण्यासाठी पायरी मार्ग तयार करण्यात आलाय, मात्र या मार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे लिंगमळा धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आलाय. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी ही माहिती दिली.
advertisement
हेही वाचा : सातारकरांसाठी 4 दिवस मुसळधार पावसाचे! लागोपाठ रेड आणि ऑरेंज अलर्ट
पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना वेध लागतात पश्चिम घाटातल्या धबधब्यांचे. साताऱ्यात सध्या अनेक धबधबे कोसळू लागले आहेत. महाबळेश्वरचा लिंगमळा धबधबा हा त्यातला लोकप्रिय. परंतु आता हा धबधबा पाहायला पर्यटकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण अतिवृष्टीमुळे याठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आलीये. येत्या 8 ते 10 दिवसांत हा धबधबा पर्यटकांसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे या भागाचं सौंदर्य आणखी खुलायला सुरूवात झालीये. 3 दिवसांमध्ये इथं 665 मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. इथल्या डोंगर दऱ्यांमधून धो धो वाहणाऱ्या लिंगमळा धबधब्याचं मनमोहक पण अक्राळ-विक्राळ रूप आता सजलं आहे.





