सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिमेकडील पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पश्चिमेकडे पावसाचा जोर असला तरी पुर्वेकडे मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसामुळे काही भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल 24 तासात 2.29 टीएमसीने वाढ झाले आहे.
advertisement
धरणातील पाणीसाठा 38.28 टीएमसीवर जाऊन पोहोचला आहे. सध्या धरणात एकूण 36.37% पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, पाटण शहरासह नदीकाठाच्या अन्य गावात लोक वस्तीत स्थानिक दुकानात बाजारपेठात पाणी घुसल्याने स्थानिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहेत. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील खळे आने येथील पूल वांग नदीला आलेल्या परिसरातील भाग पुराच्या पाण्याखाली गेला.
पाटण तालुक्यासह धरणाअंतर्गत विभागात मोठ्या प्रमाणावरील पावसामुळे पाटण शहरातील नवीन बसस्थानक परिसरात पाणी घुसल्याने व्यापारी आणि प्रवाशांसह त्रास सहन करावा लागला. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात काही गावात पाणी शिरल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय झाली. त्याचबरोबर किल्ले मोरगिरी येथे एका घराची भिंत कोसळल्याने त्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. तेथील कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहनांसह प्रवाशांची गैरसोय होऊन काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. अशा ठिकाणी पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी भेट देऊन नागरिकांना त्याचबरोबर प्रवाशांना सावधनतेचा इशारा देत अधिकाऱ्यांना या परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत 3.29 टीएमसी पाणी वाढले आहे. सध्या धरणात 38.28 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा 33.16 टीएमसी इतका आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी 64 हजार 58 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. कोयना धरण हे 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे आहे. हे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 66.97 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
वाढप्याचं काम करून पूर्ण केलं शिक्षण, हमालाच्या मुलानं करुन दाखवलं, महाराष्ट्र पोलीसमध्ये झाली निवड
पाटण तालुक्यातील कोयना येथे 220 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. येथे 308आठ मिलीमीटर तर महाबळेश्वर भागात 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, ओढ्यांना पूर -
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयनासह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ओढे, नाल्यांना पूर आला आहे. संततधार पावसामुळे घाटमार्गावर दरडीदेखील कोसळत आहेत. त्यामुळे आता येथील परिस्थित बिकट असल्याचे सांगितले जात आहे.