सातारा : गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवतेय. या योजनेचं वीज बिल आणि देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी जवळपास 2 कोटी रुपयांचा खर्च येतो. आता महावितरणाच्या सेंद्रिय केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यानं शहापूर योजनेचा वीजपुरवठा मंगळवार, 2 जुलै रोजी बंद ठेवून दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. या कामामुळे शहापूर योजनेद्वारे संबंधित भागांना होणारा पाणीपुरवठा मंगळवारी (2 जुलै) आणि बुधवारी (3 जुलै) बंद राहणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
advertisement
शेंद्रे उपकेंद्रात बिघाड झाला असून महावितरणाकडून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. काम पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 तासांचा कालावधी लागणार असल्यानं शहापूर योजनेचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसंच शहापूर योजनेचा पाणीपुरवठाही 2 दिवस बंद राहील. काही भागातील टाक्यांचं पाणी सोडण्यात येणार नाही.
हेही वाचा : photos : सातारच्या डोंगरावरील कड्याचे मोठाले दगड कोसळू लागले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नागरिकांनी काटकसरीनं पाण्याचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलंय. शहापूर योजनेच्या वीजपुरवठ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून सातारकरांना वीज आणि पाणी दोन्ही सेवा देणार, असं मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितलं.
साताऱ्यातील कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
विजेअभावी उपसा केंद्राचं काम ठप्प असल्यानं शहरातील पाणी वितरण टाक्यांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे मंगळवारी दुपार सत्रातील यशवंत गार्डन टाकीतून होणारा संबंधित पेठांचा पाणीपुरवठा बंद असेल. तर, बुधवारी गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, बुधवार नाका टाकीतून सकाळ सत्रात होणारा पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा, असं आवाहन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केलं आहे.