सातारा : सध्या सातारा पोलीस दलात पोलीस शिपाई बँड्समन या पदांची भरती सुरू आहे. या पदाच्या कौशल्य चाचणीला इतर जिल्ह्यांप्रमाणे सर्व पात्र उमेदवारांना बोलवा, अशी मागणी उमेदवारांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. सध्या केवळ 126 जणांना कौशल्य चाचणीला बोलवल्यानं उर्वरित 574 उमेदवारांकडे वाद्य वाजवण्याची कला असूनही संधी न मिळाल्यानं त्यांचं नुकसान होईल, अशी व्यथा उमेदवारांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मांडली आहे.
advertisement
करीना मोरे नामक तरुणीनं सांगितलं की, 'पहिल्या जीआरमध्ये लिहिलं होतं रिक्त पदांमध्ये बँड्समनच्या 12 जागा घेतल्या जातील, एसईबीसीसाठी एकूण 5 जागा होत्या. त्यानंतर आता नवीन यादी काढली, त्यात आम्हाला 0 जागा दिल्या आहेत. बँड्समन एसईबीसी वर्गातून मैदानी चाचणी घेतली, त्यात मला 34 मार्क मिळाले. मात्र त्यांनी नवीन जागा काढल्या आणि त्यात मला 0 मार्क दिले. जागाच द्यायच्या नव्हत्या, मग मैदानी चाचणीच घ्यायला नको हवी होती. त्यांनी सांगितलंय काही तक्रार असेल तर आवेदन अर्ज करा, त्यावर मिटिंग घेऊन तुम्हाला पुढील सूचना दिल्या जातील. एवढीच विनंती आहे की एसईबीसी वर्गातून जागा काढाव्या. हे नाही केलं तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. कारण 5 वर्षातून जागा निघतात. माझी उंचीही कमी आहे, त्यामुळे मी हे निवडलं होतं', असं सांगताना तरुणीला अश्रू अनावर झाले.
हेही वाचा : Pune News : भरतीवेळी धावता धावता कोसळला, डिहायड्रेशन नंतर ओढावला मृत्यू; नेमकं काय घडलं?
तर, 'जीआर असं आहे की, मैदानी चाचणीत 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना वाद्य वाजवण्यासाठी बोलवण्यात येईल. मात्र त्यांनी हाय लेव्हलचं मेरीट लावलं. त्यामुळे ज्यांना वाद्य वाजवता येतंय, त्या मुलांचं नुकसान झालं आणि ज्यांना वाद्य वाजवता येत नाही, त्यांना मेरिटमध्ये घेतलंय. म्हणजे जो खरा कलाकार आहे तो आज घरी आहे. आमची एवढीच विनंती आहे की, तुम्ही ज्या परिपत्रकात मैदानी चाचणीत 50 टक्के गुणांची पात्रता केली त्याप्रमाणे मेरिट लावा', असं नितीन नन्नवरे या तरुणानं म्हटलं.
दरम्यान, 'प्रोसेस अशी आहे की, सुरूवातीला बँड्समन पदासाठी आवेदन अर्ज मागितले जातात. त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाते. या चाचणीचे मार्क्स जाहीर केले जातात. त्यावर काही आक्षेप असतील तर तेही विचारले जातात. त्यानंतर आता शारीरिक चाचणीचे मार्क्स अंतिम झालेले आहेत. मग मेरिट लिस्ट काढली जाते. शिपाई आणि बँड्समन या दोन्ही पदांची नियमावली एकच आहे. लेखी परीक्षेसाठी 10 पटीने उमेदवार बोलवायचे असतात. साताऱ्यात 12 सीट्स बँड्समन पदासाठी आहेत. यासाठी 120 उमेदवार असणं गरजेचं असतं. कौशल्य चाचणीत जेवढे पास होतात ते दहा पटीने जागेपेक्षा जास्त असणं गरजेचं असतं. त्यामुळे या कौशल्य चाचणीत बोलवलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांना बँड वाजवता येत नसेल तर त्यांना बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे मेरिटनुसार उमेदवारांना बोलवण्यात येईल. संधी मिळेल पण तीसुद्धा प्रोसेसनुसार मिळेल', असं सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितलं. त्यामुळे आता यावर नेमका काय तोडगा निघतोय, साताऱ्यात मैदानी परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या खऱ्या वादकांना पोलीस भरतीत संधी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे.





