सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सन 2024 ते 25 या नवीन शैक्षणिक वर्षात तब्बल 76 सुट्ट्या असणार आहेत. रविवार मिळून 124 दिवस शाळा बंद राहिल. दिवाळीची सुट्टी 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर रोजी असणार आहे.
माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षात 76 पेक्षा जास्त सुट्ट्या होणार नाहीत. याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली आहे. नवीन शैक्षणिक वर्षातचं पहिलं सत्र 15 जून ते 27 ऑक्टोबर रोजी असेल. त्यानंतर दिवाळीची सुट्टी पडेल. मग शैक्षणिक वर्षातलं दुसरं सत्र 12 नोव्हेंबर ते 1 मे 2025 रोजी असेल.
advertisement
हेही वाचा : या सरकारी शाळेला तोड नाही! 13 पुरस्कार, 25 आदर्श शिक्षक, 200 विद्यार्थी प्रतीक्षेत
नवीन शैक्षणिक वर्षात बुद्ध पौर्णिमा, बकरी ईद, मोहरम, आषाढी एकादशी, स्वातंत्र्य दिन, पारशी नववर्ष दिन, गणेश चतुर्थी, ईद ए मिलाद, महात्मा गांधी जयंती, विजया दशमी, दसरा, लक्ष्मी-कुबेर पूजन, दिवाळी, दिवाळी पाडवा, गुरुनानक जयंती, नाताळ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, धूलिवंदन, रमजान ईद, महावीर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महाराष्ट्र दिन, कामगार दिन अशा सार्वजनिक सुट्ट्या जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केल्या आहेत. तर, रक्षाबंधन, घटस्थापना, दिवाळी (नरक चतुर्दशी) या 3 सुट्ट्या आणि बेंदूर (पोळा), गौरी पूजन, गौरी-गणपती उत्सव, अनंत चतुर्थी, मकर संक्रांत या 5 सुट्ट्या मुख्याध्यापकांच्या अधिकारातील 2 सुट्ट्या आणि त्यानंतर उन्हाळी सुट्टी सुरू होईल. अशा मिळून वर्षभरातील 76 सुट्ट्या शाळा व विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. तसंच रविवारी साप्ताहिक सुट्टीदेखील असेल.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार शालेय कामकाजाचे दिवस 230 असणं आवश्यक आहे. तर, वार्षिक शिकवणीचे 800 ते 1000 तास पूर्ण होणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्याच्या महाबळेश्वर जावली पाटण तालुक्यातील अतिवृष्टीच्या भागातल्या शाळांना 76 सुट्ट्यांच्या अधीन राहून उन्हाळी सुट्टीऐवजी पावसाळी सुट्टी शाळा समितीच्या मंजुरीनं घ्यावी लागेल, असंही माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.