सातारा : विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवतांच्या दर्शनाला जाणं म्हणजे वारी. घरून निघायचं, संतांच्या गावी जायचं, तिथून दिंडीसोबत अत्यंत प्रसन्न, भक्तिमय वातावरणात पंढरपूरचा पायी प्रवास करायचा म्हणजे वारी. वारीसोबत पंढरपूरला जाऊन विठूरायाचं दर्शन घेणं हा अनुभव अगदी विलक्षण असतो. आषाढी एकादशीला लाखो वारकरी बांधवांना हा अनुभव घेता येईल. श्री संत महाराजांच्या पालख्यांसंगे महाराष्ट्रासह देशभरातील वारकरी पंढरपूरच्या वाटेवरून पायी चालत आहेत.
advertisement
हरिभक्त पारायण सोपान काका वाल्हेकर हे जवळपास 30 ते 35 वर्षे वारीत चालत होते. आदिशक्ती मुक्ताईंची पालखी उत्तर महाराष्ट्रातून पंढरपूरला येते. त्यामुळे आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना, भाविकांना मुक्ताई आणि ज्ञानोबांचं एकत्र दर्शन घडावं यासाठी त्यांनी रथ सुरू केला.
हेही वाचा : 'मानव सेवा हीच ईश्वरसेवा', या संस्थेकडून वारकऱ्यांचे पाय दिले जातात चोळून!
मुक्ताईंच्या रथासोबत नांदेड, अलिबाग, ठाणे ,पनवेल, दौंड, शिरूर, बारामती, पुणे इथं अनेक वारकरी येतात. मुक्ताईंचा रथ ओढण्यासाठी यंदा फलटण तालुक्याच्या पवार कुटुंबातील बैल जोडीला मान देण्यात आला आहे. ही जोडी आहे हरिभक्त परायण पवार महाराज यांची. आम्ही मोठ्या भक्तिभावानं, विठ्ठलभेटीच्या ओढीनं मुक्ताईच्या रथ सोहळ्यात सहभागी झालो आहोत, अशी माहिती हरिभक्त पारायण सोपान काका वाल्हेकर यांनी दिली.
आदिशक्ती मुक्ताईंची पालखी निघते कुठून?
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची बहीण संत मुक्ताबाई. जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगरातील कोथळी हे त्यांचं समाधीस्थळ. इथूनच संत मुक्ताईंची पालखी निघते. या पालखीसंगे वारकरी तब्बल 560 किलोमीटरचा प्रवास करतात. 33 दिवस पायी चालून ते पंढरपूरला पोहोचतात.
हेही वाचा : 16व्या वर्षी सुरू केली वारी, 60 वारकऱ्यांसोबत धरली पंढरपूरची वाट अन्...
उत्तर महाराष्ट्रातून अनेक वारकरी या पालखीसोबत येतात. मात्र पश्चिम महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मुक्ताईंच्या पालखीचं दर्शन घेणं शक्य होत नाही, ते थेट पंढरपूरच्या पवित्र भूमितच होतं. म्हणूनच सर्व वारकऱ्यांना, भाविकांना मुक्ताईंचा रथ आणि पादुकांचं दर्शन व्हावं यासाठी हरिभक्त पारायण सोपान काका वाल्हेकर यांनी हुबेहूब आदिशक्ती मुक्ताईंचा रथ तयार केला. त्यात मुक्ताईंचा फोटो आणि पादुका ठेवून, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना मुक्ताईंचं दर्शन घेता येईल, यासाठी पुणे ते पंढरपूरपर्यंत हा रथ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत नेता येईल अशी सोय केली.





