नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर महाराष्ट्र विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, नेत्यांच्या नाहीत असे सांगतानाच आपला पक्ष वरचढ कसा राहिल, यासाठी पुढचे दोन महिने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी झटून काम करावे, असा कानमंत्र श्रीकांत शिंदे यांनी दिला.
advertisement
लोकप्रिय चेहरा निवडा, आपला असेल तर आपला, नाही तर बाहेरचा...
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका हा स्थानिक प्रश्नांवरती होतात. तेथील नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी लोकांची कामे कशा पद्धतीने केली आहेत, हे जनता लक्षात ठेवता. त्यामुळे या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी लोकप्रिय चेहरा निवडा. आपल्या पक्षातील असेल तर उत्तम नसेल तर उतर पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घ्या. या निवडणुका कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आहेत, नेत्यांच्या नाहीत, अशा सूचना श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
काँग्रेसची अस्वस्थता वाढणार, ठाकरेंच्या गाडीचा ड्रायव्हर सारखाच बदलतोय, श्रीकांत शिंदे यांची खोचक टिप्पणी
काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका व्हाव्यात असे कार्यकर्त्यांना वाटते तर काही ठिकाणी स्वबळावर लढावे, असेही अनेकांना वाटते. महत्त्वाचे म्हणजे पक्ष मोठा व्हावा, ही भावना महत्त्वाची आहे. निवडणुकीच्या युतीचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. तुम्ही नेटाने कामाला लागा. काँग्रेसमध्ये आता अस्वस्थता वाढणार आहे. आतापर्यंत काहींनी काँग्रेसच्या जीवावर मते मिळवली. आता राज ठाकरेंच्या हाती त्यांचे (उद्धव ठाकरे) स्टेअरिंग आले आहे, त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर सारखाच बदलतोय, अशी खोचक टिप्पणी श्रीकांत शिंदे यांनी केली.
श्रीकांत शिंदे यांनी याआधी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र विभागाचा आढावा घेतला. शनिवारी त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला. कोकण विभागाचा आढावा पुढच्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.