सोलापूर : व्यवसाय कुठलाही असला, पण त्यात जर निष्ठेने आणि मेहनतीने, सातत्य ठेवत काम केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळते, असंच एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने फुल विकण्याचा व्यवसाय करुन बंगला बांधला आहे.
तरुण शेतकऱ्याने अशी जिद्द ठेवली आणि केवळ फुल शेतीवर त्यांनी बंगला बांधून आपले स्वप्न खरे करून दाखवले आहे. प्रशांत रघुनाथ साठे (रा. मंद्रूप, तालुका - दक्षिण सोलापूर) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सात-आठ वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झाल्यावर प्रशांत आणि त्यांची पत्नी अंबिका या दोघांनी नेटाने संसार केला. राहायला घर नव्हते म्हणून फुल शेतीवर राबून त्यांनी घराची उभारणी सुरू केली.
advertisement
रिक्षा चालक ते आज गोल्ड मेडलिस्ट बॉडी बिल्डर, सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांची प्रेरणादायी कहाणी!
ऊन-वारा व पावसाचा मारा सोसत त्यांनी घडल्या प्रकारची खंत न बाळगता आनंदाने वाटचाल सुरू ठेवली. डोईवर छत नसताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली संसार थाटला. वादळ पावसात दुसऱ्याच्या वस्तीवर आसरा घेऊन नवीन घर उभारण्याचे स्वप्न पाहिले. दोघांनी जिद्दीने फुल शेतीवर पै-पै गल्ल्यामध्ये गोळा करून शेवटी बंगला उभा केला.
कोणाकडे उसनवारी न करता व कुठलेही कर्जही न काढता त्या दोघांनी जिद्दीने आपले स्वप्न तडीस नेल्याबद्दल सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे. निशिगंध, बेला, जुई ही फुले विकून त्यांनी आपला बंगला उभा केला. इतकेच नव्हे तर शेतात दिवसभर राबून नारळ, चिंच व आंब्याची झाडे बांधावर जोपासली आहेत. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात त्यांचे कष्टाचे घर आणखीन खुलून दिसत आहे.