सोलापूर : वारकरी आणि भाविकांसाठी खुशखबर आहे. पंढरपुरातील विठुरायाचं दर्शन आता 24 तास घेता येणार आहे. आषाढी वारीनिमित्त 7 जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचं दर्शन 24 तास सुरू राहणार आहे. मंदिर समितीच्यावतीनं माध्यमांना ही माहिती देण्यात आली.
आषाढी वारी नियोजनासंदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रविवारी विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला. श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या ठेवण्यात आल्या आहेत. तसंच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचं 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचं सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं.
advertisement
श्रींचा पलंग काढल्यानं काकड आरती, पोशाख, धुपारती, शेजारती, इत्यादी बंद करण्यात आलं असून नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता सुरू राहणार आहेत. तर, दर्शन 26 जुलै (प्रक्षाळपूजा) पर्यंत 24 तास सुरू असेल.
पदस्पर्श दर्शन :
एका दिवशी जास्तीत जास्त भाविकांना श्रींचं दर्शन मिळावं यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचं 24 तास मुखदर्शन आणि 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार आहे.