खरं तर, अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी नुकतंच RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीला हजेरी लावली. या उपस्थितीवरून अजित पवार आणि रोहित पवार पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. भाजपच्या लोकसभा खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी दिल्लीत नुकतीच राष्ट्रसेविका समितीची बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. याबाबतचे फोटो राणौत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. ज्यात सुनेत्रा पवार या बैठकीत उभ्या असल्याचं दिसत आहे. त्यांच्या हातात माईक देखील असल्याचं दिसून येत आहे. शिवाय स्टेजवर बाजुला भारतमातेच्या फोटोसह आरएसएसचे संपादक केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे फोटो दिसत आहेत. राष्ट्रसेविका समिती ही संघ परिवारातील महिलांसाठी काम करणारी संघटना आहे.
advertisement
यावरून रोहित पवारांनी आपल्या काकांना टार्गेट केलं आहे. अजित पवार एकीकडे शिव शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतरावा चव्हाणांचं नाव घेतात, मात्र दुसरीकडे त्यांचा प्रतिनिधी आरएसएसच्या बैठकीला जातो. हे दुटप्पी राजकारण असल्याची टीका रोहित पवारांनी केली. यावरून अजित पवारांनी देखील मिश्किल टोलेबाजी केली.
रोहित पवार नक्की काय म्हणाले?
सुनेत्रा पवार यांच्या संघाच्या बैठकीला उपस्थित राहण्यावरून रोहित पवार म्हणाले, "मला वाटतं की अजित पवार सत्तेत गेलेत, त्याची वेगळी कारणं आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांचे विचार स्विकारले नसतील, त्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी दबाव असेल. एखाद्या बैठकीला या. एखादा फोटो येऊ द्या. यामुळे कुठेतरी संदेश जातो, हे सुद्धा आरएसएसचा विचार आता स्विकारायला लागले आहेत. एका बाजुला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता, शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असाल आणि दुसऱ्या बाजुला तुम्ही आरएसएसच्या बैठकीला जात असाल, किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे. आज या राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नकोय."
दरम्यान, अजित पवार यांनी देखील सुनेत्रा पवार यांच्या संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून प्रतिक्रिया दिली आहे. "मला याबाबत काहीच माहीत नाही. मी विचारतो. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते. मला माहीत नसतं. मी आताच विचारतो, काय ग कुठे गेली होतीस?" अशी मिश्कील प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.