ठाणे ते घोडबंदर मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडली आहे. हा प्रकार कानावर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यामुळे आता महामार्ग क्रमांक 84 या रस्त्यावरील गायमुख घाटातील ठाणे ते घोडबंदर या मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. 8 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजता पासून ते 11 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेदरम्यान दुरुस्तीचे काम होणार आहे. यादरम्यान वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी या मार्गावर मोठ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे.
advertisement
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर या वाहनांना बंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय
वाहतुकीतील बदल
मुंबई आणि ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू वाहनांना वाय जंक्शन आणि कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद राहणार आहे. ही वाहने वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरकाटा मार्गे सोडली जात आहेत.
मुंबई आणि ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व मोठी वाहने कापूरबावडी जंक्शनजवळून उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजूरफाटा मार्गे जात आहेत.
मुंब्रा-कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मोठ्या वाहनांना खारेगाव टोल नाक्यावर 'प्रवेश बंद' राहणार आहे. त्याऐवजी ही वाहने खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे सोडली जात आहेत.
मुंबई आणि विरार वसईकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद आहे. गुजरात, मुंबई, विरार-वसईकडून येणारी वाहने ही चिंचोटी नाका येथून कामण, अंजुरफाटा, माणकोली भिवंडीमार्गे सोडली जात आहेत.
