नागरिकांचा विरोध का?
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ऐतिहासिक भगवा (काळा) तलाव परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, आता या तलावाभोवती फूड प्लाझा उभारण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या कामासाठी तलावाजवळील अनेक झाडं तोडली जात असल्याची माहिती समोर आली आहे. तलाव परिसरात आधीच एक अधिकृत फूड प्लाझा तयार असूनही नवीन स्टॉल्स उभारले जात आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांचा संताप वाढला आहे.
advertisement
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातून उभा राहिलेला हा तलाव कल्याणकरांसाठी भावनिक ठेवा आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडं तोडून हिरवळ नष्ट केली जात आहे असा आरोप नागरिक करत आहेत. काळा तलाव हा कल्याणचा श्वास आहे. इथे झाडं तोडून फूड स्टॉल लावणं म्हणजे निसर्गाशी अन्याय करणं आहे असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे.
दररोज सकाळ-संध्याकाळ अनेक नागरिक येथे वॉक, जॉगिंग आणि व्यायामासाठी येतात. पण सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे त्यांना व्यायामासाठी वापरणारी वॉर्मअपची जागा गमवावी लागली आहे.येथे स्टॉल्स आले तर आम्ही फिरायला कुठे जाऊ? असा प्रश्न नियमित येणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
फूड प्लाझा सुरू झाल्यास तलाव परिसरात उष्टे अन्न, प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे घाण वाढेल. यामुळे तलावाचे सौंदर्य, शांतता आणि स्वच्छता धोक्यात येईल अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभीकरण केलेला हा तलाव पुन्हा अस्वच्छ होण्याची शक्यता आहे.
तलावाच्या बाजूला आता रेती, पत्रे आणि बांधकाम साहित्याचे ढीग पडल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. नागरिकांच्या मते, प्रशासनाने या ठिकाणी फूड स्टॉल्स न उभारता तलाव आणि बगीचा स्वच्छ, हरित आणि सुंदर ठेवण्यावर भर द्यावा. शहरात आधीच अनेक हॉटेल्स आणि फूड स्टॉल्स आहेत. मग तलावावरच हे स्टॉल्स उभारण्याची गरज काय असा सवाल नागरिकांनी केला आहे.