काम किती दिवस चालेल?
कोपर स्थानकातील या पुलाचे काम ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाले असून ते 30 जानेवारी 2026 पर्यंत चालणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
स्थानकावर सध्या सुरू असलेल्या या कामात पुलाच्या पायऱ्या रुंद करणे आणि नवी बांधकाम तसेच फलाटाची लांबी वाढवणे यांचा समावेश आहे. सध्या कोपर स्थानकात मुंबई दिशेकडील फलाट 1ए, 1 आणि 2 हे 15 डब्यांच्या लोकलसाठी अपुरे ठरत होते. त्यामुळे रेल्वेने मुंबईच्या दिशेने 20 मीटर आणि कल्याणच्या दिशेने 40 मीटरपर्यंत फलाट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठ्या लोकल गाड्यांना स्थानकावर थांबण्यासाठी पुरेशी जागा मिळणार असून प्रवाशांची चढ-उतार प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या ठाणे विभागीय अभियंता अधिकाऱ्यांनी कोपर स्थानक प्रबंधकांना अधिकृत पत्राद्वारे या कामाची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली आरपीएफ आणि जीआरपी सुरक्षा यंत्रणांनाही पत्र पाठवून सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराच्या अभियंत्यांना स्थानक परिसरात ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोणत्या पर्यायाचा वापर करावा
दरम्यान या पुलाच्या बंदमुळे प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कल्याण दिशेकडील दुसऱ्या पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या दरम्यान स्थानक परिसरात सूचना फलक, दिशादर्शक आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील जेणेकरून प्रवाशांना योग्य मार्गदर्शन मिळेल.
मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की हे काम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घकालीन सोयीसाठी अत्यावश्यक आहे. फलाट लांबवल्यानंतर मोठ्या क्षमतेच्या गाड्या थांबविणे शक्य होईल आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होईल. याच प्रकारचे फलाट विस्तारीकरणाचे काम मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरही सुरू आहे. त्यामुळे ठाणे विभागातील अनेक स्थानकांवरील रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
या सर्व सुधारणा प्रकल्पांचा उद्देश प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर बनवणे हा आहे. कोपर स्थानकातील हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदार एकत्रितपणे प्रयत्नशील आहेत. प्रवाशांनी या काळात संयम बाळगून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.