फक्त चार स्थानकांपर्यंत धावणार मेट्रो
ठाण्याला मेट्रोद्वारे थेट मुंबईशी जोडण्यासाठी घोडबंदर रोडवरील गायमुख-कासारवडवली ते मुलुंड-घाटकोपरमार्गे वडाळा अशी मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. ही मेट्रो लाइन-4 आणि 4ए अशी ओळखली जाते. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन अशी दहा स्थानकांची सेवा सुरू करण्याचा आराखडा होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे सुरुवातीला फक्त चार स्थानकांदरम्यानच मेट्रो चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या गायमुख ते कापूरबवाडी दरम्यान घोडबंदर रस्त्यावरून जातात. पातलीपाडा जंक्शन परिसरात या वाहिन्या मेट्रो मार्गिकेच्या वरून जात असल्याने त्या उंचीवर नेण्याचे काम आवश्यक होते. मात्र या बदलासाठी परवानगी आणि तांत्रिक प्रक्रिया विलंबाने झाल्यामुळे संपूर्ण मार्गिकेचे काम अडचणीत आले. परिणामी, पूर्ण दहा स्थानके एकाच वेळी सुरू करणे शक्य झाले नाही.
मेट्रोची स्थानक कोणती असतील?
सध्या पूर्णपणे तयार असलेल्या चार स्थानकांदरम्यानच मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही चार स्थानके कोणती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी गायमुख आणि कॅडबरी जंक्शन ही दोन स्थानके या टप्प्यात निश्चित असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्थानिक नागरिक मात्र या निर्णयाने नाराज आहेत. त्यांच्या मते या चार स्थानकांदरम्यानचे अंतर फारसे मोठे नसल्यामुळे प्रवासात वेळेची बचत होणार नाही. रस्तेमार्गे प्रवास केल्यास या भागात सुमारे 20 मिनिटांचा वेळ लागतो आणि सरकारी बससेवा दिवसभर उपलब्ध असते. त्यामुळे फक्त चार स्थानकांवर मेट्रो सुरू केल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा फारसा होणार नाही असे नागरिकांचे मत आहे.
तरीही एमएमआरडीएने हा मर्यादित टप्पा सुरू करून नागरिकांना मेट्रोचा अनुभव द्यावा आणि पुढील बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळताच संपूर्ण दहा स्थानकांची सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.