डोंबिवली : कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमधील सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोढा पलावा एक्सपेरिया मॉल डोंबिवली पूर्व येथे रेल्वे विभागाचा टीएफसीसी हा महत्त्वाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामुळे शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार असल्यामुळे मुंबई, नवी मुंबईहून डोंबिवलीला जाणाऱ्या आणि शिळफाटा मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पांतर्गत पलावा जंक्शनकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळजे रेल्वे ब्रिजचे पुनर्बांधणीचे काम, 5 फेब्रुवारी 2025 रात्री बारापासून ते 10 फेब्रुवारी 2025 रात्री बारापर्यंत या कालावधीत होणार आहे.
advertisement
या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी हलकी, मध्यम वाहनांची वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. अवजड वाहनांना हा रस्ता बंद असेल. हे काम पूर्ण झाल्यानंतर शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठे साहाय्य होणार आहे.
नाशिकमधील पारा घसरला, पुण्यात धुके, पाहा हवामान अपडेट
डोंबिवली, कल्याण भागातील प्रवाशांनी मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा. शिळफाटा मार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने इच्छित स्थळी जावे. बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहन चालकांनी काटई नाका येथे न येता खोणी गाव येथे वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे. हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुध्द मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
या कालावधीत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंद राहणार आहे. दिलेल्या मार्गांशिवाय इतर मार्गांचा वापर वाहनांनी करू नये त्यासोबत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभागातर्फे करण्यात आले आहे.






