मुंबई: वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने चौकशीचा फास आवळला आहे. ईडीने अनिलकुमार पवार यांची कसून चौकशी सुरू केली आहे. ईडीने आता अनिलकुमार यांची सगळी कुंडलीच बाहेर काढली. अनिलकुमार पवार यांनी अनधिकृत बांधकामांसाठी दर निश्चित केले असल्याचा आरोप केला.
advertisement
अनिलकुमार यांनी ईडीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर ईडीने अनिल कुमार यांनी जमवलेल्या संपत्तीची माहितीच जाहीर केली आहे. अनिलकुमार हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
ईडीने सगळी कुंडलीच काढली...
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तपदावर असताना पवार यांनी अनधिकृत बांधकाम प्रक्रियेसाठी एक 'यंत्रणा’ तयार केली होती. त्यात प्रति चौरस फूट 150 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. ज्यापैकी 50 रुपये थेट पवार यांच्याकडे जात होते. हरित पट्ट्यांतील प्रकल्पांसाठी हा दर 62 रुपयांपर्यंत पोहोचत होता.
या सगळ्या अनधिकृत व्यवहारातून पवार यांनी 169 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमवल्याचे पुरावे ईडीला सापडले आहेत. या संपत्तीच्या माध्यमातून त्यांनी सोन्याचे दागिने, हिरे, उंची साड्या, आलिशान शेतघर आणि गोदामे खरेदी केली होती. इतकेच नव्हे, तर विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याचेही तपासात उघड झाले असल्याचे ईडीने सांगितले.
दरम्यान, नालासोपारामधील 41 अनधिकृत इमारतींना संरक्षण देण्यासाठीही पवारांनी लाच घेतल्याचे ईडीने नमूद केले आहे. या इमारतींशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र प्रत्येक इमारतीच्या चौरस फूटावर 50 रुपयांचा लाचदर निश्चित करून या बांधकामांना ‘संरक्षण’ देण्यात आल्याचे ईडीने म्हटले.
पवार यांनी मिळविलेली ही संपत्ती पत्नी, मुलगी आणि इतर नातेवाईकांच्या नावाने तसेच काही बेनामी गुंतवणुकीच्या स्वरूपात ठेवली होती. आतापर्यंत ईडीने 44 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात अनिलकुमार पवार, वाय. एस. रेड्डी यांच्यासह 18 आरोपींकडून एकूण 71 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.