वर्धा: अलिकडे कमी खर्चात आणि सामंजस्याने तात्काळ वाद मिटवण्याचं ठिकाण म्हणून लोक न्यायालयाकडे पाहिलं जातं. अनेक वाद यामाध्यमातून मिटवले जात आहेत. तरीही अनेकांना लोक न्यायालयाबाबत माहिती नसते. त्यासाठी वर्धा येथील वकील ताम्रध्वज बोरकर यांनी लोक न्यायालयाबद्दल माहिती दिलीय. लोक न्यायालय म्हणजे काय? लोक न्यायालयाचं कामकाज कसं चालतं? याबाबत जाणून घेऊया.
advertisement
लोक न्यायालय म्हणजे काय?
वाद उद्भवला तर तो शक्यतोवर सामंजस्याने सोडवावा. त्याच प्रकारे लोकन्यायालयात काम होतं. पूर्वी जुनी-जाणती माणसे एकत्र येत आणि कोणाही मध्ये उद्भवलेला कुठल्याही स्वरुपाचा वाद समजुतीने मिटवित. ज्यांच्यापुढे वाद नेला जाई ते त्या गावातील आदरणीय आणि निःपक्षपाती लोक असायचे.यालाच 'गाव-पंचायत' असे म्हणत. सध्याचे 'लोकन्यायालय' म्हणजे या गाव पंचायतीचेच आधुनिक रुप. जेथे कायदा जाणणाऱ्या निःपक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय्य तडजोड घडविते.
गर्भवती महिलांना निःशुल्क सेवा देणारे रुग्णालय; माता आणि बालकांना ठरतंय संजीवनी, पाहा Video
लोकन्यायालये कोठे भरविली जातात ?
लोकन्यायालये राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये नियमितपणे भरविली जातात. प्रत्येक जिल्हयाच्या वा तालुक्याच्या ठिकाणी दोन महिन्यातून किमान एकदा व आवश्यकता भासल्यास त्याहून अधिक वेळा योग्य त्या सूचना देऊन त्या-त्या न्यायालयामध्ये लोकन्यायालयाचे आयोजन केले जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी होणारी लोकन्यायालये जिल्हा न्यायालयात तर तालुक्याच्या ठिकाणी होणारी लोकन्यायालये तालुका कोर्ट परिसरात भरविली जातात.
लोक न्यायालयांची रचना कशी असते ?
लोकन्यायालय देखील एकाअर्थी कोर्टच असते. उलटपक्षी कोर्टात जेथे तुमच्या खटल्याच्या निवाड्यासाठी एकच न्यायाधीश असतात तथे लोकन्यायालयात किमान तीन जाणकार व्यक्तींचे पॅनेल न्यायाधीशांची भूमिका बजावते, कार्यरत अथवा निवृत्त ज्येष्ठ न्यायाधीश पॅनेलचे प्रमुख म्हणून तर अनुभवी वकील अथवा कायदयाच्या जाणकार व्यक्ती सदस्य म्हणून लोकन्यायालयाचे काम पहातात.
राज्यात पहिल्यांदाच असं घडलं, हिंगणघाटाची बातमी वाचून कराल कौतुक
लोक न्यायालयापुढे कुठले खटले येतात ?
लोकन्यायालयामध्ये दिवाणी व फौजदारी दोन्ही स्वरुपाची प्रकरणे समेटासाठी येऊ शकतात. मोटार अपघात व भूसंपादन नुकसान भरपाईचे दावे, बँका व अन्य वित्तिय संस्थांचे वसुलीचे दावे, वैवाहिक संबंधातील वाद, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टच्या कलम 138 खाली दाखल झालेली प्रकरणे वगैरेंसाठी स्वतंत्ररित्या खास लोकन्यायालये आयोजित केली जातात.
लोक न्यायालयाचे कामकाज कसे चालते?
जाहीर झालेल्या तारखेस नेमलेल्या ठिकाणी लोकन्यायालयाचे पॅनेल कामकाजास सुरुवात करते. लोकन्यायालयात त्या दिवशी सुनावणीसाठी घ्यावयाच्या खटल्यांची यादी पूर्वीच जाहीर झालेली असते. त्यातील खटले अनुक्रमे लोकन्यायालयासमोर सुनावणीसाठी घेण्यात येतात. लोकन्यायालयामसमोर पक्षकार स्वतः अथवा वकीलांमार्फत त्यांची बाजू मांडू शकतात. आवश्यकता भासल्यास लोकन्यायालय आवश्यक ती माहिती संबंधितांकडून पुराव्याच्या स्वरुपात मागवू शकतात.
खटल्यांची सर्व कागदपत्रे मूळ स्वरुपातच लोकन्यायालयापुढे असतात व पॅनेल सदस्य त्यांची योग्य ती दखल नेहमीच घेऊ शकतात. दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यावर पॅनेल सदस्य दोघांनाही समेटासाठी योग्य पर्याय देखील सुचवित असतात. पॅनेल सदस्य तटस्थपणे काम करीत असल्याने बहुतांश वेळा त्यांच्या सूचनांचा पक्षकारांकडून आदर केला जातो व त्यानुसार समेट घडून येतात.
ज्या अटी व शर्तीवर आपसात समजोता होतो त्या लगेचच लेखी स्वरुपात उतरविण्यात येतात. दोन्ही पक्षकार आणि त्यांचे वकील त्या खाली सह्या करतात. त्यानंतर लोकन्यायालयाचे पॅनल सदस्य देखील त्या खाली आपल्या सह्या करतात. अशा प्रकारे लोकन्यायालयाचा निवाडा तयार होतो. लोकन्यायालयात वाद मिटतो आणि वेळ-पैसा दोन्ही वाचते. शिवाय समाधान मिळते, अशी माहिती अॅड. ताम्रध्वज बोरकर यांनी दिली.





