अशात आता महायुतीत मीठाचा खडा टाकणारी घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने थेट स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. शिवाय संबंधित आमदाराने भाजपवर गद्दारीचे आरोप केले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती फुटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जळगावच्या पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याची थेट आणि ठाम घोषणा केली आहे. या घोषणेमुळे महायुतीला पहिला मोठा धक्का बसला असून, जळगाव जिल्ह्यात महायुतीत मिठाचा पहिला खडा पडल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
advertisement
किशोर पाटील यांनी भाजपवर आरोप करताना म्हटलं की, “दोन टर्मपासून विरोधक गुपचूप किंवा थेट उमेदवार देत मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनता आणि शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, त्यांच्या मतदारसंघात युती होणार नाही आणि शिवसेना एकहाती निवडणूक लढेल. भाजपचे काही नेते पाठीत खंजीर खूप असणार असतील तर अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा समोरासमोर लढणं कधीही बरं,” असंही ते म्हणाले.
यावेळी त्यानी भडगाव नगरपालिकेसाठी रेखा मालचे यांची उमेदवारी जाहीर केली. तर पाचोरा नगरपालिकेसाठीची उमेदवारी 1 नोव्हेंबर रोजी जनतेच्या कौलावरून जाहीर केली जाणार आहे. राज्यातील अनेक भागांत महायुतीचे नेते एकत्रित निवडणुकांची तयारी करत असताना, आमदार किशोर पाटील यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.