धाराशिव : यावर्षी बऱ्याच ठिकाणी वेळेवर पाऊस आल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. परंतु सुरूवात चांगली झाली आणि मग मात्र पावसानं उघडीप घेतली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यानं सोयाबीन सुरूवातीच्या रोप अवस्थेतच पिवळी-पांढरी पडू लागले.
लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडात 'क्लोरोसिस' लक्षणं निर्माण होतात. क्लोरोसिस म्हणजे रोपांमधली शारीरिक विकृती मानली जाते, ज्यामुळे वाढ व्यवस्थित होत नाही. जमिनीत लोहाची कमतरता असेल तर क्लोरोसिस होत नाही, तर झाडांद्वारे लोह शोषण न झाल्यामुळे होतो. लोहाची कमतरता सर्वात आधी कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्यांच्या अभावामुळे पानांवर शिरांच्या मधला भाग पिवळा पडतो आणि केवळ शिराच हिरव्या दिसतात. पानं पिवळी पडल्यानं हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी मिळतं.
advertisement
हेही वाचा : कापसाला लगेच लागते रोगराई; कशी घ्यावी पिकाची काळजी?
वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य-क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह आवश्यक असतं. बहुतांश जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह असतं. बऱ्याचदा जमिनीचा सामू (पीएच) 7.5 पेक्षा जास्त असतो, मग त्या जमिनीतील लोह उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो. त्यानंतर तो पिकांना शोषून घेता येत नाही. त्यामुळे पिकांवर लोहाची कमतरता दिसून येते.
व्यवस्थापन कसं करावं?
- पाण्याचा ताण पडल्यास तुषारच्या सहाय्यानं संरक्षित पाणी द्यावं.
- इडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 (II) 50 ग्रॅम किंवा 50 मिली अधिक 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता वाटल्यास 8-10 दिवसांनी पुन्हा एकदा फवारणी करावी.
- ज्याठिकाणी पाऊस जास्त झाला असेल अशा शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचलं असेल तर ते काढण्याची सोय करावी.
- वाफसा आल्यानंतर पीक 30-35 दिवसांचं होण्यापूर्वी एक कोळपणी करावी.
- याबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय.