सातारा : शेतीतून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळावं, यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांचा पेरणी खर्च कमी व्हावा, यासाठीसुद्धा सवलती दरात बियाणं उपलब्ध करून दिली जातात. शेतकरी बांधवांनी याबाबत वेळोवेळी माहिती मिळवणं आवश्यक आहे. सध्या पेरणीची सर्वत्र लगबग सुरूये. सातारा जिल्ह्यातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात पेरणीमध्ये व्यस्त आहेत. सोयाबीन हे सातारचं मुख्य पीक. या पिकासाठी प्रशासनाकडून अनुदान देण्यात आलं आहे. त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
advertisement
जिल्ह्यात सुमारे 3000 क्विंटल सोयाबीन बियाणे अनुदानावर कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राम बीज उत्पादन कार्यक्रमांतर्गत आणि राज्य पुरस्कार सोयाबीनच्या योजनेंतर्गत हे बियाणं कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध केले आहेत. या बियाणांसाठी महाडीबीटी वेबसाइटवर किंवा सातबारा उतारा घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करता येईल. ग्राम बीजोत्पादन मोहिमेतून 50% आणि राज्य पुरस्कृत सोयाबीन योजनेतून 30% अनुदानावर सोयाबीन बियाणं उपलब्ध आहेत.
शेतकरी बांधवांना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन :
शेतकऱ्यांनी पेरणी करताना बीज प्रक्रिया करायला अजिबात विसरू नये. उगवण क्षमता चाचणी करूनच सोयाबीनचं बियाणं पेरावं. सोयाबीन बियाणाबाबत किंवा कोणत्याही बियाणांबद्दल काही तक्रार असेल, बियाणं उगवलं नाही, ते खराब झालं तर त्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करावी.
शेतकऱ्यांनी ज्या दुकानातून बियाणे विकत घेतले असतील किंवा अनुदानावर घेतले असतील तर त्याची पक्की पावती सांभाळून ठेवावी. तसंच बियाणांचं पॅकेट आणि थोडंसं बियाणं शिल्लक ठेवा. त्याच्यासह तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार करू शकता. त्यानंतर कृषी जिल्हाधिकारी ताबडतोब कारवाई करतील, असं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं.