जालना: वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावाचं गणित हातात नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र या अडचणींना सामोरं जात शेतकरी आपल्या शेतात नवनवे प्रयोग करत असतो. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकरी महादेव सुपेकर यांनी आपल्या शेतामध्ये देखील असाच अनोखा प्रयोग केला आहे. हिमाचल प्रदेशातून विमानानं रोपं आणून त्यांनी साडेतीन एकर क्षेत्रावर सफरचंदाची लागवड केली. आता ही रोपं 4 वर्षांची झाली असून फळांनी लगडली आहेत. सुपेकर यांनी सफरचंदाच्या शेतीचं नियोजन कसं केलं? याबाबत जाणन घेऊ.
advertisement
काश्मीरमधील सफरचंद मराठवाड्यात
शेतकरी महादेव सुपेकर हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे राहतात. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील आहे. मात्र शासकीय नोकरीच्या निमित्ताने ते घनसावंगी येथे स्थायिक झाले. आवड म्हणून शेती व्यवसायात रमू लागले. काश्मीर, हिमाचल प्रदेशात पिकणारे सफरचंद मराठवाड्यात का पिकणार नाही? असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला.
एक दोन नव्हे तब्बल साडेतीन फुटांचं बाजरीचं कणीस, जालन्याच्या शेतकऱ्यानं कशी केली कमाल? Video
विमानाने आणली रोपे
सुपेकर यांनी आपल्या शेतात काश्मीर प्रमाणे सफरचंदाची बाग फुलवण्याचा निर्णय घेतला. अधिक माहिती घेतल्यानंतर हरिमन 99 जातीचे सफरचंद उष्ण प्रदेशात येत असल्याचे त्यांना समजले. हिमाचल प्रदेशातून याबाबत माहिती घेतली. त्यानंतर तेथूनच 1 हजार सफरचंदाच्या रोपांची नोंदणी केली. विमानाने रोपे छत्रपती संभाजीनगर येथे आणली. त्यानंतर रस्ते मार्गाने ती घनसावंगी येथील शेतात पोहोचली, असे सुपेकर यांनी सांगितले.
साडेतीन एकरावर सफरचंद लावगड
हिमाचल प्रदेशातून मागवलेली रोपे सुपेकर यांनी साडेतीन एकर क्षेत्रात लावली. 12 बाय 12 फुटांवर या रोपांची लागवड केली. या रोपांना पाण्याची फारसी आश्यकता नसते. तसेच हलक्या प्रतीची जमीन आवश्यक असते. सुपेकर यांनी योग्य नियोजन केल्याने तिसऱ्या वर्षी रोपांना सफरचंद लगडण्यास सुरुवात झाली. यंदा ही झाडे 4 वर्षांची झाली असून प्रत्येक झाडावर 10 ते 12 किलो सफरचंद आहेत.
शेतकऱ्याचा अनोखा छंद, जतन केली 100 ते 150 वर्षांपूर्वीची जुनी शेती अवजारे, पाहा Video
सफरचंदाच्या शेतीतून चांगल्या उत्पन्नाची आशा
सध्या सफरचंदाची झाडे फळाने लगडली आहेत. एकूण बागेतून 200 ते 250 कॅरेट सफरचंदाचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. बाजारात 120 ते 150 रुपयांचा दर सफरचंदाला मिळतोय. त्यामुळे चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असल्याचे सुपेकर सांगतात. दरम्यान, या बागेची सर्व काळजी पत्नी सुषमा सुपेकर यांनी घेतली. वेळ मिळेल तसे आपण लक्ष घातल्याचे सुपेकर सांगतात.
शेतकऱ्यांनी फळांच्या शेतीकडे वळावे
पारंपारिक पिकांमधून शेतकऱ्यांच्या हाती फारसे उत्पन्न येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात कमी आवक असलेल्या फळांची तसेच पिकांची लागवड करावी. त्याला चांगला दर मिळून दोन पैसे हाती राहू शकतात. हेच गोष्ट लक्षात घेऊन मी सफरचंदाच्या या झाडांची लागवड केली आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील किमान 100 ते 200 झाडांची लागवड आपल्या शेतात करावी, असे आवाहन सुपेकर करतात.





