सोमवारी (ता. 24) मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी परळ स्थानक परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. पाडकामाच्या दरम्यान कोणती पावले उचलायची? कोणते विभाग आधी हटवायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकल व मेल–एक्स्प्रेस गाड्यांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यावर सविस्तर चर्चा झाली.
राणीच्या बागेतील 'शक्ति'चा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसांनी उघड झाली माहिती, प्राणीप्रेमी संतप्त
advertisement
रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या गाड्यांना 25 हजार व्होल्टचा पुरवठा ओव्हरहेड वायरमधून मिळतो. यातील एक महत्त्वाचा भाग पुलाच्या खालच्या स्टील फ्रेमला जोडलेला असल्याने ती वायर सरळ बाजूला हलवणे शक्य नाही. परिणामी संपूर्ण वायर, ब्रॅकेट इन्सुलेटर आणि त्यासंबंधित सर्व उपकरणे पूर्णपणे काढावी लागणार आहेत. हे काम तांत्रिकदृष्ट्या नाजूक असून ते पूर्ण करण्यात किमान तीन ते चार तास जातील असे अभियंत्यांचे मत आहे.
विशेष पथक तयार
परळ स्थानकात एकूण पाच मार्गिका आहेत. प्रत्येक मार्गिकेवर पुलाच्या पायथ्याशी एक किंवा दोन इन्सुलेटर वेल्डेड अवस्थेत असल्याने वायर काढताना अधिक दक्षता घेणे अनिवार्य आहे. थोडीशी चूक झाली तर वीजपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी विशेष निगराणी पथक तयार करण्यात आले आहे.
तारखेची लवकरच घोषणा
एल्फिन्स्टन पुलाची एकूण लांबी 132 मीटर असून त्यापैकी 61 मीटरचा भाग मध्य रेल्वेच्या हद्दीत येतो. या भागातील संरचना सुरक्षित हटविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुरक्षा निकषांची पूर्तता करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ब्लॉकच्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
स्वतंत्र कार्ययोजना
रेल्वेच्या म्हणण्यानुसार ओव्हरहेड केबल्स दोन ते चार किलोमीटर लांब असतात आणि त्या ओएचई मास्टशी जोडलेल्या असतात. त्यामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी या मास्टचे तसेच त्यावरील उपकरणांचे स्थानांतरही करावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी स्वतंत्र कार्ययोजना तयार केली जात असून ती टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे.






