मुंबई : म्हाडाकडून मुंबई आणि ठाणे या शहरात तब्बल 11000 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. लवकरच यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पण घर खरेदी करण्यापूर्वी किंवा घर खरेदी करताना नेमकं काय करावे हे जण तुम्ही जाणून घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
दैनंदिन वापरातील एखादी छोटी वस्तू असो किंवा घर खरेदी असो, कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा त्या वस्तूचा वापर करताना त्याची शहानिशा करणे हिताचे ठरते. यामुळे भविष्यात कसलाही त्रास व अडचण होत नाहीत. एक सुजाण नागरिक किंवा ग्राहक म्हणून स्वत:चे घर खरेदी करण्यापूर्वी तपासण्यासारख्या गोष्टी कोणत्या? याची तुम्हाला अवश्य माहिती असायला हवी. याच बाबी आपण जाणून घेऊयात.
advertisement
कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचे घर म्हणजे नुसत्या भिंतींचे बांधकाम नसते. त्याच्यासाठी ते त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे एक हक्काचे सुरक्षित असे विश्व असते. त्यामुळे नवीन घर घेताना विशेष काळजी घ्यायला हवी. सर्वांत आधी तुम्ही खरेदी करत असलेल्या घराचे सगळे पुरावे अधिकृत असल्याची खात्री करून घ्या. त्यात घराची जागा, त्याचे बांधकाम, त्याच्या मालकी हक्काबाबतच्या सगळ्या पुराव्यांचा समावेश होतो. त्यासोबतच वीज आणि पाण्याची सोय, सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठीची व्यवस्था कशी आहे, तेसुद्धा पाहायला हवे.
मुख्य म्हणजे बाजारपेठ आणि इतर अत्यावश्यक सुविधा घरापासून किती अंतरावर आहेत, याबद्दलची माहितीही असायला हवी. तेथील एकंदर परिसर, तिथले वातावरण व सुरक्षा याविषयीची अनुकूलताही तपासावी. एखादे घर खरेदी करणे, हा दीर्घ काळासाठी घेतलेला निर्णय असल्याने नवीन घर खरेदी करत असताना संबंधित तज्ञांचा योग्य सल्ला ऐकावा. त्यानुसार विचारपूर्वक निर्णय घ्यावे.