या प्रकल्पाचा आढावा अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आणि पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी घेतला. बैठकीत महापालिकेचे व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुनर्बांधणीतील प्रगती, उर्वरित टप्पे, तांत्रिक अडचणी आणि त्यांची कालमर्यादा यावर सविस्तर चर्चा झाली. बांगर यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी काटेकोर नियोजन, विभागांमधील समन्वय आणि नागरिकांना होणारी संभाव्य गैरसोय कमी ठेवण्याच्या दृष्टीने विशेष सूचना दिल्या.
advertisement
प्रवाशांनी घेतला सुटकेचा निश्वास; कोपर स्टेशनवरील जीवघेणी परिस्थिती आता संपली
बांगर यांनी स्पष्ट केले की रेल्वे हद्दीतील मुख्य कामे रेल्वे विभाग करणार असून पादचारी भुयारी मार्ग, पोहोच रस्ते आणि पूल जोडणारी इतर कामे महापालिका पाहणार आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग डिसेंबर 2025 पर्यंत तर धारावी बाजूकडील दुसरा भुयारी मार्ग फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल. रेल्वे पुलाच्या उत्तर बाजूस तुळ्या बसवण्याचे काम मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात आणि दक्षिण बाजूस एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे.
धारावी आणि एलबीएस मार्गाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे 15 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यानंतर पूर्वेकडील पोहोच मार्गाचे काम सुरू होणार असून त्यासाठी सुमारे 45 दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.
सर्व नियोजित कामे वेळापत्रकानुसार पार पडल्यास उड्डाणपूल 31 मे 2026 पर्यंत पूर्णतः तयार होईल आणि 1 जून 2026 पासून नागरिकांसाठी खुला करण्याची शक्यता नक्की असल्याचे बांगर यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सायन-शीव परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन पूर्व-पश्चिम दळणवळण अधिक सुकर होण्याची अपेक्षा आहे.






