नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलांचा उद्देश सात रस्ता जंक्शन आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. विशेष म्हणजे सात रस्ता ते महालक्ष्मी दरम्यान उभारण्यात येणारा 803 मीटर लांब व 17.2 मीटर रुंद पूल हा बीएमसीने रेल्वे ट्रॅकवर उभारलेला पहिलाच केबल-स्टेड पूल असणार आहे. रेल्वे हद्दीत या पुलाची रुंदी 23.01 मीटर आहे. दुसरा पूल डॉ. ई. मोसेस रोडपासून उत्तरेस वरळी आणि धोबी घाटाकडे जाणारा असून त्याची लांबी 639 मीटर आहे.
advertisement
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये CCTV कॅमेऱ्याची नजर, किंमत ऐकाल तर अवाक व्हाल!
2016 मध्ये आयआयटी मुंबईच्या अहवालानुसार 1920 मध्ये बांधलेल्या महालक्ष्मी आरओबी वरील भार कमी करण्याची गरज ओळखून या प्रकल्पाचे नियोजन सुरू झाले. मात्र अतिक्रमण, झाडांचे संवर्धन आणि रेल्वे परवानग्या यांसारख्या कारणांमुळे कामाचा वेग मंदावला होता. बुधवारी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
महापालिका आयुक्तांनी 78 मीटर उंच मुख्य खांब 200 दिवसांत पूर्ण करण्याचे, तसेच दोन्ही बाजूंनी एकाच वेळी काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले. पुलाच्या स्पॅनसाठी 250 दिवस लागणार असून पावसाळ्यादरम्यानही काम सतत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे येत्या वर्षभरात हा पूल पूर्ण करण्याचे लक्ष्य असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
दरम्यान, पूल बांधकामामुळे प्रभावित होणारी घरे आणि आस्थापनांसाठी संबंधित वॉर्ड कार्यालय योग्य ती पावले उचलेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्लिप रोड्स वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. 745 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे वेळ व इंधन वाचणार असून मुंबईतील वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.