मुंबईतील दहिसरच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश केला. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाच्या सुनेचा भाजप प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय. ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करण्याविषयी घोसाळकरांनी हे कारण सांगितलं. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी एक इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
"प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो,
अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १ असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे.
advertisement
तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन.
आजही मी तुम्हाला शब्द देते- जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल, तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे. आज आपणच माझा परिवार आहात. म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल, अशी माझी मनापासून अपेक्षा आहे.
आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो, हीच प्रार्थना" अशी भावुक पोस्ट तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी केली होती.
तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालकपदी अन्...
दरम्यान, तेजस्वी घोसाळकरांना पक्षात घेऊन भाजपनं उद्धव ठाकरेंवर राजकीय कुरघोडी केलीय. ऐन मुंबई महापालिका निवड़णुकीच्या तोंडावर घोसाळकरांना फोडण्यात भाजपला य़श आलं आहे. 2017 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी त्या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. गेल्या काही दिवसांपासून त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. याचदरम्यान तेजस्वी यांची भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेवर संचालकपदी वर्ण लागली होती. त्याचवेळी त्या भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या.
अभिषेकला न्याय मिळवून देणार
तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी 2424 मध्ये फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्याचा तपास अद्यापही पूर्ण झाला नाही. या तपासाला गती मिळावी यासाठीही पक्ष बदलल्याचं त्यांनी सांगितलं.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 हा ओबीसी राखीव झाल्यानं निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. परंतु, पालिकेच्या वार्ड क्रमांक 7, 8 किंवा 2 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहतील असं बोललं जातंय. जस-जशी पालिका निवडणूक जवळ येवू लागलीय तस-तसं फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.
