व्रत केले, आरती केली, मग घात केला!
उत्तर प्रदेशातील अलीगढच्या सासनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. या लुटेऱ्या सुनांनी पतींसाठी नियमानुसार व्रत ठेवले. रात्री चंद्राला पाहून व्रत सोडलं, पतीला ओवाळलं आणि नंतर स्वतःच्या हाताने बनवलेले जेवण संपूर्ण कुटुंबाला प्रेमाने वाढले. जेवण नेहमीप्रमाणे सुनेनेच बनवले असल्याने कोणालाही संशय आला नाही. मात्र, या जेवणात गुंगीचं औषध मिसळलं, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब रात्री गाढ झोपी गेली. या कानाची खबर त्या कानाला लागली नाही.
advertisement
जेवणानंतर कुटुंबातील सदस्य हळूहळू बेशुद्ध पडू लागले, तेव्हा या १२ सुनांनी आपापल्या बॅग भरल्या, घरातील दागिने आणि रोख रक्कम चोरली आणि एकाच वेळी फरार झाल्या. सकाळी कुटुंब जागे झाल्यावर त्यांना घर लुटल्याचे आणि सुना घरात नसल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
बिहार-झारखंडमधून आणलेल्या 'लुटारु सुना'
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पळून गेलेल्या १२ सुनांपैकी ४ सुनांच्या कुटुंबांनी पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवली आहे. या सर्व सुनांचे फोन बंद येत आहेत. पोलीस तपासात या नववधूंबाबत धक्कादायक माहिती समोर आली. या सगळ्या तरुण मुली या ठगवणाऱ्या टोळीच्या होत्या. लग्न करुन त्या कुटुंबांना फसवायच्या. कुटुंबियांचा विश्वास संपादन करुन घरातलं सगळं सोनं नाणं लुटून फरार व्हायच्या.
या सुनांना बिहार आणि झारखंडमधून आणले गेले होते. ज्या तरुणांची लग्ने होत नव्हती किंवा ज्या घरांमध्ये मुलींची संख्या कमी होती, तिथे दलालांच्या माध्यमातून त्यांचे लग्न लावून दिले जायचे. लग्नासाठी दलालांची टोळी मुलांच्या कुटुंबीयांकडून ८० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत मोठी रक्कम वसूल करत असे. करवा चौथची पूजा होताच, सासरी नांदणाऱ्या १२ सुनांनी एकाच वेळी घरातील सर्वांना गुंगीचे औषध मिसळलेले जेवण देऊन दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला.
पूर्वनियोजित कट
पोलिसांच्या माहितीनुसार, या सर्व सुना लग्नानंतर कुटुंबासोबत आनंदाने राहात होत्या. त्या घरातील थोरामोठ्यांचा आदर करणे, घरातील काम व्यवस्थित करणे, असे सर्व 'सलीक्याने' करत होत्या. त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे त्यांनी सासू-सासरे आणि पतीचे मन अगदी कमी दिवसांत जिंकून घेतले होते.
करवा चौथच्या दिवशीही या सुनांनी शॉपिंग केली, घरात सजावट केली आणि हातावर मेहंदीही लावली होती. पण, हे सर्व त्यांच्या पूर्वनियोजित कटाचा भाग होता. ही टोळी अनेक दिवसांपासून कार्यरत असून, अलीगढसह हाथरस, बुलंदशहर आणि बदाऊनमध्येही त्यांनी अशाच प्रकारे अनेकांना फसविले आहे. मात्र, यावेळी झालेली ठगी सर्वात मोठी मानली जात आहे. या लग्नाचे व्यवहार करणाऱ्या दलालांचे फोनही आता बंद येत आहेत, ज्यामुळे हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिसांचे मत आहे.