बुधनी मांझियाइन यांची संपूर्ण कथाच विचित्र आहे. ती तारीख होती 6 डिसेंबर 1959. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात DVC (दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन) ने बांधलेल्या पंचेत धरण आणि हायडल पॉवर प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. पंडित नेहरूंचं स्वागत झारखंडच्या संथाली आदिवासी समाजातील मुलगी बुधनी करणार असल्याचं ठरलं.
या धरणाच्या बांधकामादरम्यान बुधनी मजूर म्हणून काम करायची. त्यावेळी तिचं वय सुमारे 15 वर्षे होतं. पारंपारिक आदिवासी पोशाख आणि दागिने परिधान केलेल्या बुधनीने पंडित नेहरूंचं स्वागत केलं आणि त्यांना पुष्पहार घातला. पंडित नेहरूंनी बुधनीचा आदर करत त्यांची माळ काढून तिच्या गळ्यात घातली. पंडित नेहरूंनी बुधनीच्या हस्ते बटन दाबून जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही केलं.
advertisement
पण या 15 वर्षांच्या मुलीला पंतप्रधानांच्या उपस्थितीत मिळालेला आदर तिच्याच समाजात तिची अवहेलना आणि बहिष्काराचं कारण ठरेल असं वाटलंही नव्हतं. खरं तर तोपर्यंत संथाल आदिवासी समाजात अशी परंपरा होती, की कोणतीही मुलगी किंवा स्त्री कोणत्याही पुरुषाला हार घालणार नाही. मुलगा-मुलगी किंवा स्त्री-पुरुष एकमेकांना हार घालत असतील तर तो विवाह समजला जाईल. त्यामुळे पंडित नेहरूंनी आदरपूर्वक बुधनीच्या गळ्यात जी माळ घातली, ती तिच्यासाठी चिंतेची बाब ठरली.
120 तास उलटूनही 40 मजुरांना रेस्क्यू करण्यात उशीर का होतोय, नेमकं काय कारण?
बुधनीने पंचेत धरण आणि जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन केल्याची बातमी आणि फोटो दुसऱ्या दिवशी देशातील सर्व वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाले. मात्र संथाल आदिवासी समाजात या घडामोडीबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. समाजाने पंचायत बोलावली आणि बुधनीचा नेहरूंशी विवाह झाल्याचं जाहीर केलं. ती आयुष्यभर नेहरूंची पत्नी मानली जाईल. नेहरू हे संथाल-आदिवासी समाजाबाहेरील व्यक्ती असल्याने बुधनीचा संथाल समाजाशी संबंध राहणार नाही, असं सांगण्यात आलं. पंचायतीच्या घोषणेनंतर घर, कुटुंब आणि समाजात बुधनीला स्थान नव्हतं. तिचं वडिलोपार्जित गावही पानशेत धरणाच्या बुडीत क्षेत्राखाली आलं होतं आणि त्यांचं कुटुंब विस्थापित होऊन दुसऱ्या ठिकाणी गेलं होतं.
बुधनी यांना डीव्हीसीमध्ये मजूर म्हणून नोकरी मिळाली, परंतु 1962 मध्ये त्यांना अज्ञात कारणांमुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आदिवासी समाजाच्या आंदोलनामुळे आणि विरोधामुळे डीव्हीसीने त्यांना हटवल्याचं सांगण्यात येतं. यानंतर ती कामाच्या शोधात बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील सालतोड येथे गेली आणि तिथे तिची सुधीर दत्ता नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. सुधीरने तिला आपल्या घरी नेलं, जिथे दोघंही पती-पत्नीसारखे राहू लागले. मात्र, दोघांचंही औपचारिक लग्न झालं नव्हतं.
बुधनी यांना दत्तापासून एक मुलगीही होती. अनेक वर्षांनंतरही संथाल समाजाने बुधनी आणि तिच्या कुटुंबावरील बहिष्कार मागे घेतला नाही. सुधीर आणि बुधनी यांच्या मुलीचं नाव रत्ना आहे. आता त्यांचं लग्न झालं आहे. 1985 मध्ये काँग्रेसच्या एका नेत्याने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी पंडित नेहरू आणि बुधनी यांच्याशी संबंधित घटनेबाबत चर्चा केली. यानंतर बुधनी पुन्हा एकदा चर्चेत आली. राजीव गांधींनी बुधनी यांना बोलावून घेतलं. त्यांच्या सूचनेनुसार डीव्हीसीने बुधनी यांना पुन्हा नोकरीवर रुजू केलं. इथे नोकरी करत असताना त्या निवृत्त झाल्यावर सालतोडा येथेच एका छोट्याशा घरात राहू लागल्या.
बुधनी म्हणायची की डीव्हीसीच्या प्लांट आणि धरणामुळे तिच्या पूर्वजांचं घर उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे डीव्हीसीने तिला घर द्यावं. तिचा मेसेज राहुल गांधींपर्यंत पोहोचला तर आपलं घर नक्कीच बांधलं जाईल, असं तिला वाटत होतं. बुधनी यांनी गेल्या शुक्रवारी (17 नोव्हेंबर) पंचेत हिल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांची मुलगी रत्नाही त्यांच्यासोबत होती.